डोंबिवली – प्रेयसी बरोबर झालेला वाद असह्य झाल्याने संतप्त झालेल्या एका तरूणाने शनिवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर मधील (उमेशनगर परिसर) आपल्या राहत्या इमारतीच्या अकराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या तरूणाला वाचविण्यासाठी पोलीस, अग्निशमन विभागाच्या पथक, स्थानिक रहिवाशांनी खूप प्रयत्न केले. पण ते अयशस्वी झाले. ऋषिकेश परब (२२) असे या तरूणाचे नाव आहे. तो एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. राहुलनगर मधील सुदामा इमारतीत हा प्रकार घडला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याप्रकरणी अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की ऋषिकेश परब हा राहुलनगरमधील सुदामा इमारतीत सहाव्या माळ्यावर कुटुंबीयांसह राहत होता. तो ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थिनी बरोबर त्याची मैत्री झाली होती. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या नियमित भेटीगाठी सुरू होत्या. मोबाईलवर त्यांचा दररोज संवाद होत होता.

काही महिन्यांपासून ऋषिकेश आणि त्याची मैत्रिण यांच्यात चांगला सुसंवाद होता. दोघांमध्ये चांगले बोलणे सुरू असताना, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. त्यांच्यात वादविवाद सुरू होते. शनिवारी सकाळी ऋषिकेश घरात होता. त्यावेळी तो आपल्या मैत्रिणी बरोबर बोलत होता. बराच वेळ बोलल्यानंतर त्याच्यात आणि मैत्रिणीत काही कारणावरून वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या ऋषिकेशने मोबाईल घरात जोराने फेकून दिला. आणि तो घराबाहेर पडला. तो थेट इमारतीच्या अकराव्या माळ्यावर गेला. तेथे जाऊन तो इमारतींमध्ये जिन्याच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत (इनर बाॅक्स-डक्ट) जाऊन इमारतीवरून उडी मारण्यासाठी उभा राहिला. इमारतीमधील रहिवाशांच्या आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला.

त्यांनी तातडीने हालचाली करून ऋषिकेशला इमारतीच्या डक्टमधून सुखरूप बाहेर येण्याच्या सूचना केल्या. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. तो जीवाचे बरेवाईट करील या भीतीने कुुटुंबीय आणि काही जाणकारांनी ही माहिती विष्णुनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सामंजस्याने तरूणाला खालून समजविण्याचा प्रयत्न केला. तो ऐकत नसल्याने तात्काळ पालिका अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस, अग्निशमन जवान ऋषिकेशला सुखरूपपणे खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्याने रागाच्या भरात इमारतीच्या बाहेरील भागातील सज्ज्यात येऊन इमारती खाली उडी मारली. गंभीर दुखापत झाल्याने तो मरण पावला. त्याला तातडीने पालिका रुग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याचा संशय साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी व्यक्त केला आहे.