डोंबिवली – डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ७६वा गणेशोत्सव साजरा करताना युनेस्कोने नुकत्याच जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचे अत्यंत देखणे आणि कलात्मक रूप मखरामध्ये साकारले आहे. या अनोख्या संकल्पनेमुळे गणेशभक्तांसोबतच इतिहासप्रेमींमध्येही मोठी उत्सुकता आहे.

दरवर्षी वेगवेगळ्या सांस्कृतिक विषयांवर आधारित देखावे साकारणाऱ्या या मंडळाची यंदाची संकल्पना आहे जागतिक वारसा लाभलेले शिवरायांचे १२ किल्ले ज्येष्ठ कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी सलग २५व्या वर्षी मंडळाच्या सजावटीची जबाबदारी पार पाडली असून, अवघ्या चार दिवसांत संपूर्ण मंडपात किल्ल्यांची भव्य सजावट उभारण्यात आली आहे.

मंडपात प्रवेश करताच जणू एखाद्या दगडी किल्ल्यात पाऊल ठेवत असल्याचा भास होतो. मंडपातील बारा दरवाज्यांतून युनेस्को मान्य १२ किल्ल्यांचे देखावे उभे केले आहेत. त्यासोबतच पक्ष्यांच्या किलबिलाटाचा ध्वनी, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना यामुळे मंडपात एक प्रसन्न, प्रेरणादायक वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या सजावटीतून हिरोजी इंदुलकर यांची ऐतिहासिक कामगिरीही अधोरेखित करण्यात आली आहे. रायगडाच्या श्री जगदीश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर कोरलेला “सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर” हा शिलालेख यंदाच्या निमंत्रणपत्रिकेच्या मुखपृष्ठावर घेऊन त्यांनाही मानाचा मुजरा करण्यात आला आहे.