भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशारा देत कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ठरवणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला आहे. मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयात बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे असे म्हटले असून तसा आदेशच त्यांनी काढला आहे. जर आम्ही तसे म्हटले नाहीतर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुनगंटीवार यांच्यावर टिका केली. भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार केला जातो आणि यातूनच संस्कृतीची सुरूवात होते. कोणी जय भीम बोलतो तर कोणी जय हिंद म्हणतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्वाच्या आहेत. पण, लोकांनी बोलायची सुरुवात कशाने करायची, हे तुम्हीच ठरविणार किंवा सांगणार का, मग तुम्हाला सुधीरजी मुनगंटीवार म्हणायचे की सुधीर मुनगंटीवारजी असे म्हणायचे किंवा भाऊ म्हणायचे हे सुद्धा तुम्ही जाहीर करून टाका, अशी टिकाही त्यांनी केली. अशी जोर जबरदस्ती लोकांवर करू नका. भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका. ते कुणाला आवडत नाही आणि आवडणारही नाही. कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ठरवणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आता काय बोलायचे हे जबरदस्तीने म्हणवून घेणार का आणि ते म्हटले नाही म्हणून जेलमध्ये टाकणार का, असा प्रश्न विचारत मीठवर लावलेल्या कराविरोधात लाखो लोक रस्त्यावर आले होते, असा हा भारत आहे. आजच्या दिवशी त्याची आठवण ठेवा, असेही त्यांनी म्हटले आहे.