अंबरनाथः पाच वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीजवळच्या मांगरूळ येथील डोंगरावर स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून १ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली होती. मात्र त्यानंतर दोनदा लागलेल्या वणव्यात अनेक झाडे जळून खाक झाली होती. त्यानंतरही झाडे जगवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाने अखेर या डोंगरावर सुमारे ३४ हजार झाडे जिवंत असून १० ते १२ फुटांपर्यंत वाढलेली आहेत. त्यामुळे मांगरूळच्या डोंगरावरील जंगल बहरत असल्याचे दिसते आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत याठिकाणी पुन्हा नव्याने वृक्षारोपण करण्यात आले.

अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर मांगरूळजवळ मोठी डोंगरांची रांग आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या पुढाकाराने ५ जुलै २०१७ रोजी येथे वृक्षारोपण सप्ताहाचे औचित्य साधत एक लाखांहून अधिक झाडांचे रोपण करण्यात आले होते. वन विभागाच्या मदतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाच्या सदस्यांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी यात सहभाग नोंदवला होता.

यावेळी सुमारे ८५ हजार एकर जमिनीवर रोपण झाले होते. त्यामुळे येथे मोठे जंगल निर्माण होईल अशी आशा होती. मात्र २० डिसेंबर २०१७ रोजी येथे काही समाजकंटकांनी डोंगराला आग लावली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर झाडांचे नुकसान झाले होते. त्यानंतर वन विभागाच्या माध्यमातून जळालेली झाडे जगवण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी येथे दोन कुपनलिका खोदण्यात आल्या. तिन्ही डोंगरावर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. यात सुमारे ८० टक्के झाडे वाचली. मात्र दुसऱ्या वर्षात २०१८ मध्येही अशाच प्रकारे येथे आग लावण्यात आली होती. त्यानंतर येथील वनक्षेत्रपालाला निलंबीत करण्यात आले होते.

याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र येथे वणवा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे ठरवले गेले. त्यासाठी सगुणा रूरल फाऊंडेशनची मदत घेण्यात आली. त्यानंतर येथे वणवा लागलेला नाही. त्यामुळे आजच्या घडीला मांगरूळच्या या डोंगरावर सुमारे ३४ हजार ५०० झाडे सुमारे १० ते १२ फुटांपर्यंत वाढलेली आहेत. या झाडांमुळे मांगरूळचा डोंगर हिरवागार झाला आहे.

हेही वाचा : “उपचारांकरिता किमान मांत्रिक तरी द्या”; श्रमजीवी संघटनेची शासनाकडे उपरोधिक मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐन उन्हाळ्यातही मांगरूळचा डोंगर दूरूनही बहरलेला दिसतो. रविवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या डोंगरावर आणखी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, वन विभागाचे अधिकार आणि कर्मचारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते. डोंगर राखल्याबद्दल यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली.