लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील फेरीवाले शनिवारी रात्रीपासून हटविले. शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून फ प्रभागाचे अधिकारी व्यक्तिश फेरीवाले, फेरीवाल्यांचे नेते यांना भेटून रविवारी दुपारपर्यंत किमान एकही फेरीवाला मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौक, फडके रस्ता, चिमणी गल्ली भागात दिसणार नाही अशा सूचना करत होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रविवारी डोंबिवलीत महाविजय २०२४ संकल्प अभियान आणि अमृत कलश यात्रेनिमित्त रविवारी सकाळी डोंबिवलीत येत आहेत. मानपाडा रस्त्यावरील शिवाजी पुतळा ते गणेश मंदिर दरम्यान ते अमृत कलश यात्रेत सहभागी होणार आहेत. फेरीवाल्यांचे अडथळे अमृत कलश यात्रेत येऊ नयेत म्हणून शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मानपाडा रस्ता शिवाजी पुतळा ते फडके रस्ता, गणेश मंदिर रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या टपऱ्या, ठेले, कायमची बस्ताने हटविली. या रस्त्याच्या पदपथांच्या आधार दगडांवर सफेद पट्टे मारून फडके रस्ता देखणा करण्यात आला आहे.

आणखी वाचा-महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

फडके रस्ता, चिमणी गल्ली, नेहरू रस्ता, बाजीप्रभू चौक भागातील फेरीवाले कायमचे हटवा म्हणून नागरिक दररोज पालिका आयुक्त, उपायुक्त, फ प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. त्याची दखल घेतली जात नाही. मात्र भाजपचा एक नेता येणार म्हणून पालिकेने फेरीवाल्यांना रविवारी अर्धा दिवसासाठी फडके रस्ता फेरीवालामुक्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. फडके रस्ता मोकळा आणि फेरीवाला मुक्त राहण्यासाठी भाजपच्या प्रत्येक नेत्याने आणि मंत्र्याने दररोज फडके रस्ता भागात यावे. किमान नागरिकांना या भागातून चालण्यास प्रशस्त रस्ता मोकळा उपलब्ध होईल आणि फेरीवाले या भागातून कायमचे हद्दपार होतील, अशी मागणी नागरिक करत आहेत.

आणखी वाचा-मोदींचे वादळ इंडीया आघाडीला उध्वस्त करेल – चंद्रशेखर बावनकुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविपारी सकाळी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना फडके रस्त्यावरील शुकशुकाट पाहून धक्काच बसला. अनेक वर्षानंतर फडके रस्ता प्रथमच मोकळा, चालण्यास सुटसुटीत, प्रशस्त वाटत आहे. डोंबिवली पूर्व ग प्रभाग हद्द, पश्चिमेत ह प्रभाग हद्दीतील फेरीवाले हटविण्यात पालिकेला यश आले. पूर्व भागातील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक भागातील फेरीवाले हटविण्यात पालिकेला यश येत नसल्याने आणि पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने हा प्रकार होत असल्याने एका जाणत्या नागरिकाने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.