– नवी मुंबई विमानतळ उदघाटन कार्यक्रमात देखील जलपर्णीच्या वस्तूंची भेट

ठाणे – नैसर्गिक जलस्रोतांना विळखा देणारी वनस्पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलपर्णी पासून विविध शोभेच्या आणि दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचा प्रकल्प जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आला होता. या प्रकल्पातून परड्या, फाईल फोल्डर, योगा मॅट, लॅपटॉप बॅग, डायनिंग टेबल मॅट यांसह भेट स्वरूपात देता येतील अशा वस्तू तयार करण्यात येत आहेत. तर दिवाळीच्या मुहूर्तावर या वस्तूंची मागणी चांगलीच वाढली असून मिठाई, फळे आणि इतर भेटवस्तू देण्यासाठी परड्या तसेच इतर शोभेच्या वस्तू यांची बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे यंदाची दिवाळी जलपर्णी पासून विविध वस्तू तयार करणाऱ्या महिला बचत गटांसाठी आर्थिकदृष्टया उत्तम ठरत आहे.

जलपर्णी ही जलस्रोतांवर तरंगणारी हिरव्या रंगाची सुंदर दिसणारी पण अतिशय घातक वनस्पती आहे. शोभेच्या उद्देशाने भारतात आणल्यानंतर ती वेगाने पसरली आणि आता देशातील जवळपास सर्वच नद्यां, तलावांमध्ये आढळते. ही वनस्पती काही दिवसांतच दुप्पट वाढते आणि पाण्याच्या पृष्ठभागावर दाट हिरवा थर तयार करते. या थरामुळे पाण्यातील सूर्यप्रकाश खाली पोहचत नाही, त्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया अडते आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते.

परिणामी मासे आणि इतर जलचर प्राणी मरू लागतात. जलपर्णी सडल्यावर जलाशयाच्या तळाशी गाळ वाढतो, पाण्याची साठवण क्षमता कमी होते आणि जलाशय हळूहळू भरून जातात. तसेच या स्थिर पाण्यात डासांची उत्पत्ती वाढते, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. जलपर्णीमुळे पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता घटते, तर नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अडतो. म्हणजेच ही वनस्पती पर्यावरणीय आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर गंभीर संकट निर्माण करते.

याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेने जलपर्णीचे पर्यावरणपूरक पुनर्वापराचे नवे दालन उघडले आहे. जलपर्णीचा पाणीशोषक खोड भाग आणि मजबूत देठ वापरून विविध वस्तू तयार केल्या जात आहेत. यासाठी प्रथम तलावांमधून जलपर्णी गोळा केली जाते. नंतर तिची स्वच्छ धुलाई करून सूर्यप्रकाशात सुकवली जाते. कोरडी झालेली जलपर्णी चिरून तिचे तंतू तयार केले जातात. या तंतूंना एकत्र करून दोर, धागा किंवा जाळी तयार केली जाते. पुढे हाताने किंवा साध्या यंत्रांच्या साहाय्याने त्या तंतूंमधून आकर्षक वस्तू विणल्या जातात.

तयार वस्तूंना नैसर्गिक वार्निश किंवा लेमिनेशन देऊन टिकाऊ बनवले जाते. या प्रक्रियेत वापरलेले साहित्य पूर्णतः जैवविघटनशील असल्याने पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. या उपक्रमामुळे जलाशयांमधील जलपर्णीचे प्रमाण कमी होऊन पाण्याची गुणवत्ता सुधारते आणि दुसरीकडे ग्रामीण महिलांना नव्या रोजगाराचा मार्ग खुला होतो. सध्या या प्रकल्पांतर्गत कल्याण आणि आसपासच्या भागांमधील महिला बचत गट कार्यरत आहेत. त्यांच्या मेहनतीने तयार झालेल्या वस्तूंना “इको-फ्रेंडली” या नावाखाली मोठ्या शहरांतही मागणी वाढली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका छायादेवी शिसोदे यांनी दिली आहे.

चौकट शासकीय कार्यालयांमध्ये फाईल फोल्डरचा प्रामुख्याने वापर होतो. जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून या प्रकल्पातून फाईल फोल्डरची खरेदी केली जात आहे. तर सध्या दिवाळीच्या मुहूर्तवार या वस्तूंना चांगली मागणी आहे. भेटवस्तू विकणारे दुकाने, मिठाईची दुकाने यांच्याकडून परडीला याची चांगली मागणी आहे. यामुळे महिला बचत गटांना चांगले अर्थाजन होत आहे. तसेच इतर भेटवस्तूंची देखील चांगली मागणी आहे. तर नुक्त्याच्या पार पडलेल्या नवी मुंबई विमानतळ उदघाटन कार्यक्रमात देखील प्रमुख पाहुण्यांना जलपर्णी पासून तयार केलेल्या परडीचा वापर करण्यात आला.