Eknath shinde ठाणे : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे शनिवारी हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता आणि खुर्ची गेली, तेव्हा हंबरडा फोडला आणि आता पुन्हा हंबरडा मोर्चा काढत आहेत,” अशा शब्दांत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना हंबरडा मोर्चावरून उद्धव ठाकरे यांच्या टिका केली. आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. जमीन वाहून गेलेली, शेती खरडून गेलेली, घरांची पडझड झालेली पाहिली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून ठरवले की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे.
म्हणूनच आम्ही ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि दहा हजार रुपयांची तात्काळ मदत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. आम्ही आधीच सांगितले होते की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, आणि आज त्या आश्वासनाची पूर्तता होत आहे, असे शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा रहिलो
ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, त्यांना ४७ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई आणि मनरेगा योजनेंतर्गत ३ लाख रुपये प्रति हेक्टर अतिरिक्त सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचं भरपाई पॅकेज राज्याच्या इतिहासात प्रथमच देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या संकटावरून काही जण राजकारण करत आहेत. पण आम्ही त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत, असे शिंदे म्हणाले.
आधार मिळाल्याशिवाय राहणार
मी आधीही म्हटले होते, काही जण शेतकऱ्यांच्या बांधावर जातात पण, त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू पाहून तरी एक बिस्किट दिला का? आम्ही मात्र मोठे मदत किट पाठवले, शेतकऱ्यांचा दसरा आनंदात गेला आणि दिवाळीही आनंदाची होईल याची काळजी घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मोठ्या पॅकेज दिले आहे आणि शेतकरी यामधून सावरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.
‘पुतण्या-मावशीचे प्रेम’
घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हाही हंबरडा फोडला, आणि आता पुन्हा हंबरडा मोर्चा काढत आहेत. हे निव्वळ ‘पुतण्या-मावशीचे प्रेम’ आहे आणि शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केले जात आहे. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खऱ्या अर्थाने काम केले आहे. आमचे ध्येय त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे आहे, असे शिंदे म्हणाले.