ThaneTraffic ठाणे :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांनी अवजड वाहनांना (१० चाकी किंवा त्यापेक्षा जास्त) घोडबंदर भागात दिवसा प्रवेशबंदीचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी रात्री ठाणे वाहतुक पोलिसांनी त्यासंदर्भाची अधिसूनचा काढली होती. त्यानुसार, ठाणे ते बदलापूर पर्यंत अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून हे वाहतुक बदल आजपासून २ ऑक्टोबर पर्यंत दररोज सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत लागू असणार आहेत. त्यामुळे अवजड वाहने केवळ मध्यरात्री वाहतुक करू शकतील. परंतू, या अधिसूचनेत काही मार्गांवर बुधवारी सुधारणा करण्यात आली आहे.
असे आहेत वाहतुक बदल
मुंबई, नवी मुंबई येथून आनंदनगर चेकनाका मार्गे ठाणे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना आनंदनगर चेकानाका जवळ प्रवेशबंदी आहे.
मुंबई, विरार, वसई येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना आधी फाऊंटन हाॅटेलजवळ प्रवेशबंदी देण्यात आली होती. परंतू, यात बदल करुन निरा केंद्र गायमुख घाट येथे प्रवेशबंदी दिली आहे.
मुंबई येथून एलबीएस रोड मार्गे ठाणे शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना मॉडेला चेकनाका येथे प्रवेशबंदी आहे.
बेलापूर-ठाणे मार्गे विटावा जकात नाका मार्गे कळवा येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना नवी मुंबईतील पटणी चौकात प्रवेशबंदी देण्यात आली होती. यात बदल करण्यात आला असून यामार्गे येणाऱ्या वाहनांना विटावा जकात नाका येथे प्रवेश बंदी लागू केली आहे.
महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून ठाणेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना शिळफाटा येथे प्रवेशबंदी आहे.
तळोजा येथून दहीसर मोरी मार्गे कल्याण फाटा येथून कल्याण आणि ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना दहीसर मोरी येथे प्रवेशबंदी आहे.
गुजरात येथून घोडबंदर मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी आहे.
वाडा मार्गे नदीनाका भिवंडी शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना पारोळ फाटा येथे तर वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना
धामणगाव, जांबोळी जलवाहिनी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी केली आहे.
नाशिक येथून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना सरवली गाव येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
नाशिक महामार्गाने बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण न्हावाशेवा येथे जाण्यासाठी बापगाव, गंधारी मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना आधी पडघा येथील
तळवली चौकात प्रवेशबंदी करण्यात आली होती. यात बदल करण्यात आला असून या वाहनांना बापगाव, गंधारी चौक येथे प्रवेशबंदी आहे.
मुरबाड येथून शहाड पूल मार्गे कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना म्हारळ जकात नाका येथे प्रवेशबंदी केली आहे.
नवी मुंबई येथील तळोजा एमआयडीसी येथून तळोजा बाह्यवळण, उसाटणे, खोणी, नेवाळी नाका मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना उसाटणे नाका आणि
नेवाळी नाका येथे तर,तळोजा एमआयडीसी येथून तळोजा बाह्यवळण उसाटणे, खोणी मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंदी आहे.
कर्जत येथून बदलापूरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना अंबरनाथ येथील खरवई नाका येथे प्रवेशबंदी आहे.
मुरबाड येथून बदलापूर, अंबरनाथच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना अंबरनाथ येथील ऐरंजाड येथे प्रवेशबंदी आहे.