कल्याण : ठाणे, कल्याण आणि शिळफाटा या १५ ते २० किलोमीटर अंतरासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकाॅप्टरचा वापर करणार असतील तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. या फर्लांगभर अंतरासाठी खरच हेलिकाॅप्टरची आवश्यकता आहे का, असा खोचक प्रश्न उपस्थित करत कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आणि मनसे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या ठाणे जिल्ह्यातील हेलिकाॅप्टर दौऱ्याला ट्वीवटरच्या माध्यमातून लक्ष्य केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या काळात ते त्यांच्या ठाणे निवासस्थानाहून ठाण्यातील रेमंड हेलिपॅडवर येतील. तेथून ते १५ मिनिटात हेलिकाॅप्टरने उड्डाण करून शिळफाटा रस्त्यावरील पलावा संकुल परिसरातील हेलिपॅडवर उतरतील. तेथून ते शासकीय वाहनाने शिळफाटा रस्त्याने कल्याण येथील बिर्ला महाविद्यालय येथील आषाढी एकादशी निमित्त आयोजित दिंडीला झेंडा दाखवतील. शहाड विठ्ठल मंदिरातील महापुजेचा कार्यक्रम आटोपून ते पुन्हा मोटारीने शिळफाटा रस्त्याने पलावा हेलिपॅडवर येऊन तेथून ते ठाणे येथील रेमंड हेलिपॅडवर उतरतील. तेथून ते आपल्या ठाण्यातील निवासस्थानी पोहचतील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागेपुढे सरकारी वाहन ताफा आहे. त्यामुळे १५ ते २० किलोमीटर अंतरातील ही ठिकाणे गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २५ ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. अशा परिस्थितीत करदात्या जनतेचा पैशाची उधळपट्टी करण्यासाठी फर्लांगभर अंतरासाठी पालकमंत्री हेलिकाॅप्टरचा वापर करून करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत असतील तर ते योग्य आहे का, असा प्रश्न मनसे नेते राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हेलिकाॅप्टरने हा दौरा खरोखर होणारच असेल तर या दौऱ्याचे फलित काय. पांडुरंग विठ्ठलला ते कोणते मागणे करतील, असा प्रश्न राजू पाटील यांनी केला. महिनाभराच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने काही पायी दिंड्या शिळफाटा रस्त्याने गेल्या. त्यांनाही शिळफाटा रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी, खड्डे आणि येथील रखडलेल्या उड्डाण पुलांचा फटका बसला.

पालकमंत्री साहेबांनी जर ठाणे, कल्याण शिळफाटा ते कल्याण, डोंबिवली शहरातून मोटारीने फेरफटका मारत शहाड येथील दौरा केला असता तर किमान या भागातील लोकांचे दररोज वाहतूक कोंडीतील मरण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले असते. रखडलेला पलावा चौकातील उड्डाण पुलाचे पण दर्शन यानिमित्ताने झाले असते. आणि प्रवाशांचे हाल पाहता आले असते, असे राजू पाटील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण ग्रामीण भागाचे आमदार असताना राजू पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पाठपुरावा केला होता. पाठपुरावा केलेला एकही विषय मार्गी लागला नाही. या सगळ्या कारनाम्यांना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची फूस असल्याचा पाटील यांचा समज असल्याने ते सातत्याने शिंदे पितापुत्रांना ट्वीवटरच्या माध्यमातून लक्ष्य करत आहेत. लोकसभेला खासदार शिंदे यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या राजू पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे पितापुत्रांनी दणका देऊन कोणाच्याही स्वप्नात नसताना राजेश मोरे यांना निवडून आणले. ती सल पाटील यांच्या मनात आहे. त्यामुळे ते शिंदे पितापुत्रांना सातत्याने लक्ष्य करत आहेत.