डोंबिवली – भारतीय जनता पक्षाने शिंदे शिवसेनेचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पक्षात प्रवेश देऊ नये आणि शिंदे शिवसेनेने भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे मौखिकदृष्ट्या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. असे असताना भाजपने रविवारी डोंबिवलीत युती धर्माला तिलांजली दिली. शेवटी आपण कोण हे दाखवून दिलेच. त्यामुळे यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणत्याही प्रकारची संयमाची भूमिका न घेता आपल्याही पक्ष प्रवेशांच्या आक्रमक मोहिमांना सुरूवात करावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे डोंबिवलीतील उपजिल्हाप्रमुख आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक राजेश कदम यांनी समाजमाध्यमांतून केली.

भाजपचा पक्ष प्रवेशांचा कार्यक्रम डोंबिवली जीमखाना येथे पार पडल्यानंतर तात्काळ शिंदे शिवसेनेचे राजेश कदम यांनी भाजपवर निशाणा साधल्याने शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी महापालिका निवडणुका शिंदे शिवसेना, भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते महायुती म्हणून आपण एकत्र लढू असे जाहीरपणे सांगत आहेत. तरी स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण पाहता कार्यकर्ते, इच्छुक उमेदवारांना महायुतीमध्ये पालिका निवडणुकीसाठी युती होण्याची लक्षणे कमीच आहेत असे दिसत आहे.

शिंदे शिवसेना, भाजपने स्थानिक, राज्य पातळीवर एकमेकांचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांना आपल्या पक्षांमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. यामुळे महायुतीत नाहक मिठाचा खडा पडेल आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याची झळ बसेल अशी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये यापूर्वीच खल झाला आहे. असे असताना भाजपने रविवारी डोंबिवलीत शिंदे शिवसेनेतील काही कार्यकर्ते, नगरसेवक आपल्या पक्षात घेतल्याने शिंदे शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली.

शिंदे शिवसेनेतील माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे तीस वर्षाचे निष्ठावान कार्यकर्ते शिंदे शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. या कार्यकर्त्यांबरोबर महिला बचत गट, महिला आणि मिंत्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश शिंदे शिवसेनेच्या जिव्हारी लागला.

वामन म्हात्रे यांचे कार्यकर्ते हे शिंदे शिवसेनेचे आहेत हे माहिती असुनही त्यांना भाजपने प्रवेश दिला. याविषयी शिंदे शिवसेनेत भाजपविषयी नाराजी पसरली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष अशाप्रकारे कृती करून महायुती धर्म पाळत नसतील तर मग, शिंदे शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणत्याही प्रकारचा संयम न दाखविता आपला आक्रमक बाणा दाखवून महायुती धर्माचा विचार न करता भाजपमधील इच्छुकांना पक्षात प्रवेश देणे सुरू करावे, असे उपजिल्हाप्रमुख कदम यांनी समाज माध्यमांतील आपल्या मजकुरातून संदेश आणि भाजपला इशारा दिला आहे.