BEST Election Results : ठाणे : ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करत असते. विधानसभा निवडणूकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही ८० जागा लढवून ६० जागा जिंकलो. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही महायुती प्रंचड बहुमतात जिंकेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
बेस्टच्या (BEST) पतपेढी निवडणूकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित उमेदवार उभे केले होते. परंतु या निवडणूकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचे एकही उमेदवार निवडून आले नाही. त्यामुळे आता भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरे बंधूवर टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली.
कल्याण ग्रामीण येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकांना विकास, कल्याणकारी राज्य पाहिजे आहे. काम करणाऱ्यांना पुढे नेण्याचे आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसविण्याचे जनतेने ठरविले आहे. महाविकास आघाडीने स्थगित केलेले सर्व प्रकल्पावरील स्थगिती आम्ही काढून टाकल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ईव्हीएमवर राज्यातील निवडणूका जिंकल्यावर ईव्हीएम यंत्र चांगले असल्याचे ते म्हणतात. पण निवडणूकात पराभूत होतात, तेव्हा निवडणूक आयोगाला दोष देतात. बेस्ट पतपेढीच्या निवडणूका बॅलेट पेपरवर होत्या, मग आता काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणूकीत आमच्या कामाची पोचपावती दिली. आमचे २३२ जण निवडून आले. लाडक्या बहिणींनी २३२ चा जोडा विरोधकांना दाखविला. येत्या निवडणूकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल असेही शिंदे म्हणाले. राज्याचा विकास आणि कल्याणकारी योजना राबविणे आमचा अजेंडा आहे. लोकसभा, विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकणार आहे असेही ते म्हणाले.
ठाकरेंना धक्का
कल्याण ग्रामीण भागातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी शिंदे गटात प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.