लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरी करणाऱ्या वीज ग्राहकांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. गेल्या महिन्यात टिटवाळ्यात वीज ग्राहकांच्या घरांच्या तपासणीत ८७ जणांकडे २४ लाख २० हजार रुपयांची वीजचोरी आढळली. या सर्व ८७ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत टिटवाळा मंदिर परिसर, बल्याणी, बनेली, मांडा पश्चिम भागातील ४० तर गोवेली शाखेंतर्गत म्हारळ व वरप भागात ३३ जणांकडे, तसेच खडवली परिसरात १४ जणांकडे वीजचोऱ्या आढळून आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-ठाणे : टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी चोरी

वीज चोरीचे देयक व दंडाच्या रकमेचा भरणा टाळणाऱ्या या ८७ जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार मुरबाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, नीलेश शिर्के, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे आणि यांच्या पथकाने ही कारवाई केली.