शहापूर : मध्यरेल्वेच्या आटगाव – तानशेत दरम्यान नंदीग्राम एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये गुरुवारी बिघाड झाल्याने डाऊन मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दरम्यान, कसारा लोकल रद्द करण्यात आल्याने ऐन गर्दीच्या वेळेत नोकरदार प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अन्य इंजिन उपलब्ध केल्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

मध्यरेल्वेच्या आटगाव स्थानकावर डाऊन मार्गावर नंदीग्राम एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बिघाड झाला. यामुळे एक तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे नोकरदार प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अन्य इंजिनची व्यवस्था झाल्यानंतर तब्बल एक तासाने म्हणजेच सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली. यामुळे कसाऱ्याला जाणारी सायंकाळी ६.४१ वाजताची लोकल आसनगाव स्थानकात रद्द करण्यात आली. काही लांबपल्ल्याच्या गाड्याही उशिराने धावत होत्या. यामुळे असंख्य प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.

कसारा मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, मालगाडी व एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड होणे, ओव्हरहेड वायर तुटणे असे प्रकार वारंवार घडत असून संघटना याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असते. मात्र या गंभीर घटनांकडे रेल्वेप्रशासन कायम दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. संघटनेचे शैलेश राऊत यांनी केला. शैलेश राऊत, कल्याण – कसारा प्रवासी संघटना.