पर्यावरण हा महानगरांमधील कळीचा मुद्दा. धूळ, धूर यांनी भरलेली हवा, वाहनांचा-बांधकामांचा सततचा आवाज, प्रदूषित झालेले पाणी, झाडांवर पडणारी कुऱ्हाड, आक्रसत जाणाऱ्या मोकळ्या जागा.. या समस्यांची यादी न संपणारी. आतापर्यंत त्याबद्दल सर्व पैलूंची चर्चा पार पडलीय. पण पर्यावरणाच्या या ऱ्हासामध्ये वैयक्तिक जबाबदारी कोणीही घेत नाही. कोणत्याही समस्येच्या निराकरणाची सुरुवात स्वतपासून करता येते. स्वच्छता हा पर्यावरणाचा महत्त्वाचा पैलू. कचऱ्याची निर्मिती जिथे होते, तिथेच त्याची विल्हेवाट लावली तर पर्यावरणावरील भार खूप कमी होऊ शकतो. सरकारची मदत घेऊन किंवा अगदी स्वतंत्ररीत्याही अनेक रहिवाशांनी ही जबाबदारी घेतली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांचा आदर्श समोर ठेवण्याचा हा प्रयत्न..

कचरा व्यवस्थापनाचे ‘ठाणे’
प्रतिनिधी, ठाणे
कचरा व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी मानून ठाण्यातील अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सोसायटी अथवा व्यक्तिगत पातळीवर निर्मूलन प्रकल्प राबविले आहेत. कचरा टाकण्यासाठी नवे डम्पिंग ग्राऊंड्स शोधण्यापेक्षा आपल्याच घरात अथवा आवारात त्याचे व्यवस्थापन करणे सोपे आणि अधिक पर्यावरणस्नेही आहे, हे या प्रयोगांतून दिसून आले आहे.       
एका ठिकाणी साचणारा कचरा दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकणे ही कचरा व्यवस्थापनाची ‘डम्पिंग ग्राऊंड’ पद्धत आता कालबाहय़ झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आदी मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वच शहरांमधील कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. ‘एमएमआरडीए’च्या वतीने संकल्पित तळोजा येथील सामू्हिक कचरा व्यवस्थापन केंद्र हा सध्या तरी कचरा निर्मूलनाचा एकमेव उपाय सांगितला जात असला तरी शहरांपासूनचे अंतर लक्षात घेता तो तितकासा व्यवहार्य नाही. या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरात सोसायटी तसेच व्यक्तिगत स्तरावर अवलंबविण्यात आलेली कचरा व्यवस्थापनाची पद्धत निश्चितच अनुकरणीय आहे.
ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नसल्याने डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे धड व्यवस्थापन होत नाही. उलट सोसायटीच्या आवारात जैविक अथवा गांडूळ पद्धतीने ओल्या कचऱ्याचे नीट विघटन होऊन त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. सोसायटीतील सुरक्षारक्षक, माळी अथवा अन्य मदतनीसांच्या मदतीने हा प्रकल्प राबविला जाऊ शकतो, हे ठाण्यातील तारांगण, कोरस आदी गृहसंकुलांनी दाखवून दिले आहे. प्रकल्पातून तयार होणारे खत हे आवारातील उद्यानासाठी वापरता येते. जास्तीचे खत बाजारात विकताही येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जात नाही.
तारांगण आणि कोरस या दोन वसाहतींपासून प्रेरणा घेऊन ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ब्युटी आर्केड कमर्शियल आर्केड या व्यापारी संकुलानेही स्वयंस्फूर्तीने आवारातच कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे या संकुलातील कचरा आता घंटागाडीमध्ये टाकला जात नाही.
समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने सोसायटय़ांच्या आवारात कचरा निर्मूलन प्रकल्प राबविले. साकेत, लक्ष्मी नारायण, ब्रह्मांड, आनंद विहार आदी सोसायटय़ांमध्येही कचऱ्यापासून खत निर्माण करण्याचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
सोसायटय़ांप्रमाणेच वैयक्तिक अथवा कौटुंबिक स्तरावरही अनेकांनी घरच्या घरीच कचरा निर्मूलन सुरू केले आहे. कौस्तुभ ताम्हनकर, जयंत जोशी आदी गेली अनेक वर्षे ठाण्यात या संदर्भात जनजागृती करीत आहेत. जयंत जोशी यांनी घरी तयार होणारा ओला कचरा विघटित करणारी प्लॅस्टिकची टोपली नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.
या टोपलीत घरात तयार होणाऱ्या सर्व ओल्या कचऱ्याचे जैविक पद्धतीने व्यवस्थित विघटन होते.    

पर्यावरण रक्षणाची ‘सायकलॉजी’
ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना ‘सायकल सिटी’चे वेध
श्रीकांत सावंत, ठाणे
ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा धसका घेऊन अनेकजण पुन्हा एकदा सायकलकडे वळू लागले आहेत. घरात सायकल असणे हा आता प्रतिष्ठेचा आणि जागरूकतेचा मुद्दा बनू लागला आहे. ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या भागात  सायकल क्लब, सायकल स्पर्धा आणि वैयक्तिक आयुष्यातही सायकल अधिकाधिक वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

डोंबिवलीचा ‘सायकल क्लब’
शहरातील प्रदूषणावर मार्ग शोधण्याच्या उद्देशाने डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी दैनंदिन वापरासाठी दुचाकीपेक्षा सायकलचा वापर करण्याचा निर्णय घेतला तर आठवडय़ातून एकदा विरंगुळा म्हणून मित्राबरोबर सायकलस्वारी करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. यानंतर दीपक देशपांडे, चिंतन शहा, प्रदीप अदुर, महेश खरे यांसारख्या सायकलप्रेमींनी त्यांना साथ देण्याचे ठरवले. यातूनच डोंबिवली सायकल क्लब ही संस्था सुरू झाली. २०११ मध्ये क्लबची स्थापन झाली. आजवर या क्लबमध्ये १५०हून अधिक जण सहभागी झाले आहेत. गेल्या चार वर्षांत दर रविवारी शहरापासून १५ ते २० किमीच्या परिसरात फेरफटका मारण्याच्या त्यांचा उपक्रम अखंड सुरू आहे. या क्लब सदस्यांनी देशभरातही सायकलवरून भ्रमंती केली असून डॉ. पुणतांबेकर यांनी मुंबई ते पणजी हा प्रवास केला आहे तर ममता परदेशी यांनी लडाखच्या पर्वतरांगांवर सायकलिंग करण्याचा अनुभव घेतला आहे. क्लबच्या महिला सदस्याही सायकलचा आग्रह धरत असून युरोपमध्ये गेलेल्या नैना आघारकर तिथेही सायकलिंगचा आनंद घेत आहेत. ७६ वर्षांचे अय्यर, ८० वर्षांचे शरद दाते या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत आहेत.
या ग्रुपच्या बरोबरीने तरुणांची अनेक मंडळे लांब पल्ल्याचे सायकल दौरे आयोजित करतात. रात्रीच्या वेळी डोंबिवलीतून मुंबईमध्ये सायकलवरून जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सायकलवरून फेरफटका मारण्यात बाइकपेक्षाही जास्त आनंद मिळतो, असे या क्लबमधील तरुण सायकलस्वार सांगतात. या क्लबचे सदस्य असलेले शशांक वैद्य दर शनिवारी डोंबिवली ते ठाणे असा सायकल प्रवास करतात. कामाच्या ठिकाणी जातात. या क्लबमध्ये शाळकरी मुलांचा सहभाग असून महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आणि तरुण यात मोठय़ा संख्येने सहभागी होतात. शहरातील वाहतूक कोंडीचा फटका या सदस्यांना होत असून प्रदूषणमुक्तीसाठी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल ट्रॅकची सुविधा महापालिकेने उपलब्ध करण्यात यावी, अशी क्लबच्या सदस्यांची मागणी आहे.

महागडय़ा सायकलचीही क्रेझ..
एकापेक्षा एक दर्जेदार सायकलींची खरेदी करण्यावर या सायकलप्रेमींचा भर आहे. ममता परदेशी यांनी २५ हजारांची रेसिंग सायकल खरेदी केली आहे. या क्लबमधील सदस्यांच्या १ ते दीड लाख रुपये किमतीच्या सायकली आहेत.

सायकल स्टॅण्ड..
अनेकांना सायकल नसल्याने सायकल चालवता येत नाही. त्यामुळे डोंबिवलीजवळच्या गृहसंकुलापासून डोंबिवली स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांसाठी भाडेतत्त्वावर सायकल उपलब्ध करून देण्याची संस्थेची इच्छा आहे. अत्याधुनिक सायकल स्टॅण्ड उभारून तेथून स्मार्ट कार्डच्या माध्यमातून नागरिकांना सायकल उपलब्ध करून दिली जाणार अल्याचे पुणतांबेकर यांनी दिली.

वेध सायकल सीटीचे..
डोंबिवली शहराची प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने डोंबिवली शहराला ‘सायकल सिटी’ बनवण्याचे मिशन आखले आहे. जानेवारी २०१५ मध्ये व्यापक सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करून या मोहिमेचा शुभारंभ डोंबिवली शहरात झाला.
कोकण युवा प्रतिष्ठान ही संस्था चार वर्षांपासून शहरात विविध सामाजिक कार्य करते. संस्थेच्या वतीने डोंबिवली शहरातील प्रदूषणाचा व्यापक अभ्यास सुरू आहे. त्यात अर्थातच प्रदूषणकारी कंपन्यांचा शहराला अधिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाहनांच्या माध्यमातून होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषणही अधिक आहे. तसेच त्यामुळे निर्माण होणारी वाहतुक कोंडीसुद्धा शहरातील एक मोठी समस्या आहे. यावर सायकल हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे सायकल चालवणे हे शहरातील नागरिकांच्या मनात िबबवण्याचा प्रयत्न संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे. ‘सायकल सिटी डोंबिवली’ या मोहिमेला गती देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे दिनेश मोरे यांनी दिली.
सायकल सिटी डोंबिवली या उपक्रमाची घोषणा संस्थेच्या वतीने करण्यात आली असून शहरातील सायकल क्लब, सायकलप्रेमींचे संघटनकरण्यात आहे. डोंबिवली-दिल्ली, डोंबिवली-कन्याकुमारी अशा लांबच्या मोहिमा पूर्ण करणारे सायकलपटू निखिल माने यांच्यासह सायकलवरून लांबचा प्रवास करणाऱ्या सायकलपटूंची ओळख शहरवासीयांना करून देण्यात आली. शहरातील प्रत्येक तरुण शहरात फिरताना दुचाकीच्या ऐवजी सायकलला पहिले प्राधान्य देईल, अशी स्थिती निर्माण करण्याचा ‘कोकण युवा प्रतिष्ठान’चा मानस आहे. २०११ मध्ये प्रदूषणामध्ये देशात १४व्या क्रमांकावर असलेले डोंबिवली शहर दहाव्या क्रमांकावर आल्याने प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवू लागली असून हिरव्या पावसाने डोंबिवलीकरांची झोप उडवली आहे. ‘आज नाही तर कधीच नाही’ अशी परिस्थिती डोंबिवली शहरावर उद्भवू नये यासाठी सायकल वापर अधिक व्यापकपणे होण्याची गरज आहे. हे शहर सायकलयुक्त झाल्यास प्रदूषण काही अंशी घटू शकते म्हणूनच संस्थेने हा उपक्रम सुरू केल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

निर्माल्य विल्हेवाटीचा ‘समर्थ’ पर्याय
प्रशांत मोरे, ठाणे
पर्यावरणप्रेमींनी ठाण्यात १० वर्षांपूर्वी गणपतीविसर्जनासाठी सुचविलेला कृत्रिम तलवांचा पर्याय स्वीकारला गेल्यानंतर मूर्तीसोबत असलेल्या निर्माल्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. कारण तलाव प्रदूषित करण्यात इतर घटकांबरोबरच निर्माल्यही मोठय़ा प्रमाणात कारणीभूत ठरते. देवाला वाहिलेली, हारतुऱ्यात गुंफून सत्कारमूर्ती किंवा अन्त्ययात्रेत मृतदेहावर टाकण्यात आलेली फुले दुसऱ्या दिवशी कचराच ठरतात, हे वास्तव आहे. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या संस्थेने त्यावर उपाय म्हणून विसर्जन काळात निर्माल्य कलश ठेवले. सुरुवातीला फक्त मासुंदा, रायलादेवी आणि कळवा तलावावर हा प्रकल्प राबविण्यात आला. तिथे गोळा झालेल्या निर्माल्याचे खत बनवून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समारंभपूर्वक देण्यात आले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांच्या मनात निर्माल्यापोटी असलेल्या श्रद्धेला विवेकाची जोड मिळाली. फुलांचा कचरा होण्यापेक्षा सेंद्रिय खत होणे कधीही चांगले हे त्यांना पटू लागल्याने दर वर्षी निर्माल्य कलश योजनेला वाढता प्रतिसाद मिळू लागला. २००८ मध्ये गणेशोत्सवात २० टन निर्माल्य जमा झाले. त्याच्या पुढच्याच वर्षी तिप्पट म्हणजे ६० टन निर्माल्य कलशात संकलित झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत २०१० मध्ये १२० टन निर्माल्य जमा होऊ लागले. त्यामुळे ‘समर्थ भारत व्यासपीठ’ने या उपक्रमाची व्याप्ती वाढवली. शहरातील सर्वच लहान-मोठय़ा विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवण्यात आले. गणेशोत्सवातील निर्माल्य योजना यशस्वी झाल्यानंतर शहरात एरवी वर्षभर तयार होणाऱ्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्याचा विचार पुढे झाला. त्यातूनच महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कायमस्वरूपी निर्माल्य व्यवस्थापन करण्याची योजना पुढे आली. गेल्या गणेशोत्सवापासून कोपरी विभागात असलेल्या महापालिका मलनि:सारण केंद्रालगत निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय सुचविणाऱ्या ठाण्याने आता इतर शहरांना निर्माल्याचेही खत होऊ शकते, हे दाखवून दिले आहे.
दोन टन निर्माल्य संकलन
सध्या ठाणे शहरातील २० मंदिरे, १७ स्मशानभूमी आणि एका फुलबाजारातून दररोज दोन टन निर्माल्य गोळा केले जाते. त्या निर्माल्यापासून येथे खत तयार केले जाते. तूर्त दररोज २०० किलो खत तयार होते. त्यातील ४० टक्के खत महापालिकेला उद्यानांसाठी दिले जाते. उर्वरित ६० टक्के खत विविध संस्था तसेच व्यक्तींना विकते. दररोज सहा टन कचरा विघटित करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. जैव आणि गांडूळ (बायो आणि वर्मी कंपोस्टिंग) या दोन्ही पद्धतीने निर्माल्य विघटित केले जाते.

मंदिर, स्मशानभूमीतील निर्माल्य संकलन
या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी ११ वाजता मंदिरे तसेच स्मशानभूमीतून निर्माल्य संकलित करून साडेचार वाजेपर्यंत प्रकल्पस्थळी आणले जाते. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता चेंदणी कोळीवाडय़ातील फुलबाजारात गाडी जाते. प्रकल्प कार्यान्वित झाल्याने फुलबाजारातील दरुगधी कमी झाली आहे. कारण फुलांचा कचरा खाली पडून कुजून जात होता. तो उचलून नेण्यासाठी पूर्वी व्यापाऱ्यांना पैसे मोजायला लागायचे. आता प्रकल्पाची गाडी संध्याकाळीच येत असल्याने बाजारात आपोआपच स्वच्छता राखली जाते.

निर्माल्य ते निर्मल गोल्ड
निर्माल्यापासून तयार होणारे काळेशार खत ‘निर्मल गोल्ड’ या नावाने अधिकृतपणे विकले जाते. संस्थेने त्याची रीतसर नोंदणी केली आहे. सध्या सेंद्रिय पिकांना खूप मागणी आहे. शहरातही अनेक जण आता घरच्या घरी काही प्रमाणात का होईना हिरवाई जपण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी हे खत उपयुक्त आहे.

आता सोसायटय़ांमध्ये निर्माल्य कलश
या प्रकल्पाची सुरुवात गणेशोत्सव काळात विसर्जन घाटावर ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशाद्वारे झाली होती. अशाच प्रकारचा प्रयोग ठाण्यातील निवडक १०० सोसायटय़ांमध्ये करण्याचा विचार असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक भटू सावंत यांनी दिली. कारण सध्या प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा येथे १/३च काम सुरू आहे. मंदिरे तसेच स्मशानभूमीप्रमाणेच घरांमध्येही कमी-अधिक प्रमाणात दररोज फुले वापरली जातात. लग्नाच्या हॉलमध्येही मोठय़ा प्रमाणात फुलांचा वापर होतो. सध्या कचऱ्यातच जाणारी ही फुलेही संकलित करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

दोन यंत्रे, आठ कामगार
या प्रकल्पात एकूण आठ कामगार काम करीत आहेत. त्यातील तिघे जण आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करतात. दोघे कचरा बारीक करणाऱ्या यंत्रांवर काम करतात तर तिघे संकलनाचे काम करतात. निर्माल्याबरोबरच या प्रकल्पात शहरातील उद्यानांमधील कचऱ्यावरही (गार्डन वेस्ट) प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे उद्यानांमधून कचरा आणण्यास सुरुवातही झाली आहे.

‘इंधन’ निर्मितीचाही विचार
अगदी सुकून गेलेल्या निर्माल्याच्या गोवऱ्या बनविण्याचा विचार असल्याचे ‘समर्थ भारत व्यासपीठ’चे उपाध्यक्ष उल्हास कार्ले यांनी सांगितले. ग्रामीण भागात शेणाच्या गोवऱ्या थापून त्या चुलीत इंधन म्हणून वापरल्या जातात. तशाच पद्धतीच्या गोवऱ्या सुकलेल्या निर्माल्यापासून बनवून त्या बेकरी तसेच भट्टय़ांमध्ये वापरता येतील. थोडक्यात या कचऱ्यापासून इंधनही बनविता येऊ शकेल.

उकीरडामुक्त देश
घर स्वछ असावे यासाठी सतत धडपडणारी माणसे आपल्या परिसराबाबत मात्र उदास असतात. आपले घर स्वछ करून जो केरकचरा आपण काढतो तो बिनदिक्कतपणे आपण बाहेर फेकून देतो तेंव्हा आपल्या हाताला कधी कंप जाणवत नाही! याचे कारण म्हणजे घर आपले असते व बाहेरचा रस्ता किंवा परिसर हा पालिकेचा असतो ही भावना आपल्या मनात पक्की बसलेली आहे. जा देशाच्या संस्कृतीने संपूर्ण मानवतेला ‘वसुधव कुटुंबकम्’ म्हणजे ‘हे विश्वचि माझे घर’ असा अतिशय संवेदनाशील संदेश दिला त्या देशातील नागरिक मात्र तो संदेश केव्हाच विसरून गेल्यासारखे वागतात व त्यामुळे देशाचा उकिरडा झाला आहे. म्हाडाच्या किंवा विविध गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात किंवा बाजारात नजर टाकली तर सर्वत्र  कच-याचे साम्राज्य पसरलेले दिसते. या साम्राज्यातील काही कचरा आपल्या घरातून आलेला असतो याचा आपल्याला सोयीस्करपणे विसर पडतो. खेरतर प्रत्येक घराने ठरविले की माझ्या घरातील कोणताच कचरा मी महानगरपालिकेला देणार नाही तर कचऱ्याची समस्या उरणारच नाही. मग शहरांसाठी मोठाली क्षेपणभूमी  लागणार नाही. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मोठय़ा योजनाही लागणार नाहीत! पण विकेंद्रित स्वरूपात घराघरात निर्माण होणारा कचरा एकत्रितपणे हजारो टनांनी  महानगरपालिकांच्या गाडय़ांमधून शहराबाहेर पाठविला जातो तेव्हा या प्रचंड भस्मासुरामुळे आíथक ताण तर पालिकेच्या तिजोरीवर येतोच, पण त्याचा पर्यावरणीय ताण आपल्या सर्वानाच जाणवतो. कचरा वाहतुकीमुळे सर्व शहरात दरुगधी पसरत राहते. परिसराला बकालपणा येतो. याच कचऱ्यातून उद्याचे स्त्रोत पुनश्च निर्माण होणार असतात त्या निसर्ग नियमालाच तडा जातो हे आपल्या लक्षातही येत नाही.
कचऱ्याबाबतची एवढी उदासीनता दाखवून आपण आपल्या नव्या पिढीपुढे कोणते आदर्श ठेवीत आहोत, याचेच भान आपल्या कुणाला राहिले असे अजिबात वाटत नाही. बाल्कनीतून वा खिडकीतून कचरा बाहेर टाकताना घरातील मुले पहात असतात आणि असेच वागायचे असते असा धडा आपण त्यांना यातून देत असतो! आपल्या घराभोवती किंवा इमारती भोवती जो कचरा दिसतो त्यात खरकटे व वाया गेलेले अन्न, अंडय़ाची टरफले, कागदी बोळे, केळ्याच्या साली, सिगारेटची थोटके, कागदी कप, पेले, प्लास्टिकच्या डिशेस व चमचे, वापरलेले सॅनिटरी नॅप्कीन्स आणि गर्भनिरोधक आणि हे कमी म्हणून की काय त्या प्लास्टिकच्या पिशव्या देखील असतात! मुलांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, वास्तुशांत, सत्यनारायणाची पूजा, बढती मिळाल्याच्या आनंदात समारंभ साजरे करताना आपण प्लास्टिकच्या डिस्पोजेबल वस्तूंचा आपली सोय म्हणून वापर करतो आणि दुसऱ्या दिवशी त्या फेकलेल्या वस्तूंमुळे पर्यावरण किती दूषित होते याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. गणपतीच्या मूर्तीचे जी विटंबना विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पाहावयास मिळते त्यात व पर्यावरणाचीही जी विटंबना होत आहे त्यात गुणात्मक काहीच फरक नसतो. प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे की मी कोणत्याही परिस्थितीत या पर्यावरणास घातक असलेल्या गोष्टींचा वापर न करता समारंभ साजरे करीन.
केळीच्या सालाचे विघटन झाले नाही तर उदयाच्या केळींना जी फळे येतील त्यांना साली नसतील व आपल्या वंशजांना त्यांचा आस्वाद घेता येणार नाही, हे लक्षात घेऊन केळीच्या साली व साराच कचरा पर्यावरणास किंवा निसर्गास परत कसा करता येईल याची उपाययोजना आपल्याला करावयाची आहे. प्रगत देशात लोक कचरा पिशवीत ठेवतात व योग्य ठिकाणीच त्याची विल्हेवाट लावतात. भारतीयांसाठी हा एक आदर्श आहे. प्रत्येक भारतीयाने स्वच्छतेबाबत काळजी बाळगली, तर हा देश उकीरडामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.