19शहरात सुरू असलेल्या पर्यावरण जागृतीच्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणस्नेही भाव वाढीस लागला असला तरी शहरीकरणाच्या वेगापुढे हे प्रेम तोकडे पडत आहे. नागरिकांकडूनच पर्यावरणाला प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाले असून त्यांच्याकडूनही पर्यावरणास दुय्यम स्थान दिले जात आहे. माणूस जेव्हा वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी तो प्रदूषण करतोच. त्यामुळे विकासासाठी एक सीमारेषा आखण्याची गरज आहे, तरच पर्यावरण हा जगण्याचा मंत्र बनू शकेल. सध्या विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुका लढवल्या जात असल्या तरी येत्या काही वर्षांत त्या पर्यावरणाच्या मुद्दय़ावर लढवल्या जातील. त्यामुळे शक्य तितकी पर्यावरण जागृती लोकांमध्ये करण्याची गरज आहे. पर्यावरण दिनाच्या पाश्र्वभूमीवर पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रात गेली २३ वर्षांहून आधिक काळ काम करणारे पर्यावरण तज्ज्ञ विद्याधर वालावलकर यांच्याशी साधलेला संवाद..

– ’ठाण्यामध्ये पर्यावरण दक्षता मंचाची सुरुवात कशी झाली?
– महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यरत होतो. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची आवड होती. १९९१ मध्ये ठाण्यात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. तेव्हा त्याच बरोबरीने सामाजिक कार्यामध्येही सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ठाण्यातील रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येचा अभ्यास सुरू केला. त्यावेळचे वाहतूक पोलीस अधिकारी आणि महापलिका आयुक्तही रस्त्यांच्या समस्येत अडकून पडले होते. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरणाची कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यांच्याच मदतीने रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर आधारित एक सर्वेक्षण सुरू करून एक तीन दिवसीय परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच पर्यावरणविषयक कामाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच पर्यावरण दक्षता मंचाचे काम सुरू होते. त्याचबरोबर ‘इनव्हायरो व्हीजिल’चेसुद्धा काम सुरू होते. मात्र ‘इनव्हायरो व्हीजिल’कडे महापालिकेने जैव वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) विघटित करण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे २००९ पासून पर्यावरण दक्षता मंच या नावाने रीतसर नोंदणी करून त्याद्वारे पर्यावरणविषयक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. अर्थात नोंदणी जरी २००९ मधली असली तरी या संस्थेचे कार्य गेली २३ वर्षे सुरू आहे.

– ’पर्यावरणविषयक काम घराघरांमध्ये कसे पोहचले?
– वाहतूक कोंडीविषयक परिषदेत रामभाऊ म्हाळगी संस्था सहआयोजक होती. त्यावेळी ठाणे शहरातील आमदार, खासदार, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींबरोबरच मुंबई ठाण्यातील पालिका व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पर्यावरणविषयक पुरेशी जनजागृती झाली. लोकांपर्यंत हा उपक्रम पोहचवण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुमारे ३५० नागरिकांनी या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या सूचना, विचार या माध्यमातून मांडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीविषयी नागरिकांची समस्या समजू शकली. या परिषदेनंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये वाहनांची संख्या भरमसाठ वाढली. सुमारे १६ ते १७ टक्के वाहने वाढल्याने प्रदूषणाचा वेगही कमालीचा वाढला. त्यामुळे त्या विषयाचा अभ्यास आणि संशोधन करून ठाणे महानगरातील वाहतुकीचे प्रदूषण हे पुस्तक संकलित करण्यात आले. त्यातूनच लोकांमध्ये पर्यावरणीय काम पोहचण्यास सुरुवात झाली. वाहतुकीनंतर संस्थेने घनकचरा व्यवस्थापन हा विषय घेतला आणि त्या दृष्टीने काम सुरू झाले. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहकार्य केले. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनासारख्या शालेय विद्यार्थ्यांनी हा उपक्रम घराघरांमध्ये पोहचवण्यासाठी प्रयत्न केले.

– ’पर्यावरण दक्षता मंचाचे काम कसे वाढत गेले?
– सध्या पर्यावरण दक्षता मंचाचे काम दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरामध्ये संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे २२ उपक्रम सुरू असून हे उपक्रम सर्वामध्ये लोकप्रिय होऊ लागले आहेत.
– ’पर्यावरणविषयक कायदेशीर लढाई लढावी लागली आहे का?
– आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हाच आहे. एखाद्याविषयी वाद निर्माण झाल्यास संवाद साधून त्यात मध्यम मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र मार्ग निघाला नाही तर कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबावा लागतो. संस्थेने अशा कायदेशीर लढाईमध्ये नागरिकांच्या पाठीशी राहण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मात्र कायम न्यायालयीन लढाई करण्यामुळे संस्थेची ताकद कमी होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे न्यायालयीन लढाईपेक्षा नागरिकांचे हात बळकट करण्याकडे आमचा प्रयत्न आहे. ठाणे पूर्व भागात एका विकासकाने एका रात्रीत ५०० हून अधिक ट्रक रॅबीट टाकून अत्यंत महत्त्वाची जैवविविध नष्ट केली. तेव्हा मात्र संस्थेने अन्य संस्थांच्या माध्यमातून याविषयी न्यायालयीन दावा दाखल केला. मात्र या लांबच्या प्रक्रियेमुळे अडचणी निर्माण होत असतात.

– ’भविष्यामध्ये पर्यावरण दक्षता मंचाची वाटचाल कशी असेल?
– पर्यावरण दक्षता मंचचे काम दिवसेंदिवस वाढत असून सध्या ‘इन्व्हायरो व्हिजिल’च्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून संस्थेचे उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. मात्र हे काम वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळेच संस्थेचे काम अधिक लोकांपर्यंत पोहचणे शक्य होऊ शकेल. पुढील काळात पर्यावरणाचे ज्ञान देणारी शैक्षणिक संस्था शहरामध्ये उभारण्याचा संस्थेचा मानस असून त्यामध्ये पर्यावरणाच्या विविध संकल्पनांचा उलगडा यशस्वी होऊ शकेल. सध्याच्या काळातील पर्यावरणाचे ज्ञान हे कायदे कसे मोडावेत यासाठीच दिले जाते. मात्र कायदे राखण्यासाठी प्रयत्न करणारे व त्या दृष्टीने काम करणारे तरुण घडवण्याचे काम या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून होऊ शकेल. त्यासाठी संस्थेला चांगल्या जागेचीसुद्धा आवश्यकता आहे.

– ’पर्यावरणासंदर्भात नागरिकांमध्ये बदल घडलेत का?
– बदल घडले असले तरी शहरीकरणाच्या वेगापुढे हे बदल खूपच तोकडे पडू लागले आहेत. त्यामुळे होणारे काम चांगले असले तरी त्याबद्दल आम्ही समाधानी नाही. इथे राहत असताना येथील संसाधनांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेत असताना या भागातील पर्यावरणासाठी काम करण्याची मानसिकता बाहेरून शहरात राहायला येणाऱ्यांमध्ये अद्याप रुजलेली नाही.