जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे खाडीतील जैवविविधतेच्या दर्शनासाठी खाडी यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील पर्यावरणस्नेही नागरिकांना पक्षांच्या दुनियेची अनोखी सफर घडवून आणली. ठाणे पूर्वेतील जेटीतून सुरू झालेल्या या खाडी यात्रेने विटावा, ऐरोली, दिवा, वाशी आणि पुन्हा ठाण्याच्या जेटीपर्यंतच्या सुमारे साडे तीन तासांच्या प्रवासामध्ये खाडी किनाऱ्यावरील ३० हून अधिक पक्ष्यांचे दर्शन घडवले. वाशी किनाऱ्यावर हजारोच्या संख्येने दिसणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाचा विहार या मंडळींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
ठाणे खाडी किनाऱ्यावर प्रचंड प्रदुषणाचा विळखा बसला असून तेथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. खाडीतील या सगळ्या स्थित्यंतराचा वेध घेण्यासाठी खाडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी या यात्रेची सुरूवात झाली. सकाळची वेळी पक्षांच्या दर्शनासाठी योग्य मानली जात असली तरी खाडी किनाऱ्यावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पक्षांची हजेरी सुरू होती. वेगवेगळ्या जातीची बदके, बगळे, पाणकावळ्यांचेही दर्शन या निमित्ताने घडले. लेसर व्हिसलिंग डक, वियर टेल्ड स्व्ॉलो, ग्रे हेरॉन, स्पॉट बिल्ड डक, लिटिल कॉर्मेरण्ड, कॉमन क्रो, ब्लॅक काईट, ब्ल्यू रॉक पिजन, ब्लॅक विग्ड स्टिल्ट, पेण्टेड स्टॉर्क अशा निरनिराळ्या जातीच्या पक्ष्यांचे दर्शन झाले.