डोंबिवली आठवड्यातून दोन ते तीन वेळा बंद पडत असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील जिना सुस्थितीत चालू राहिल अशी कोणतीही व्यवस्था मध्य रेल्वे प्रशासनाकडून केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आठवड्यातून अधिक वेळ चालू राहण्यापेक्षा सरकता जिना बंद राहण्याचे प्रमाण अधिक आहे, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

गुरुवारी सकाळी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अनेक प्रवासी पूर्व भागातील सरकत्या जिन्याचे दिशेने गेले, तेव्हा त्यांना जिना बंद स्थितीत आणि त्याचे प्रवेशव्दार कुलुपबंद केले असल्याचे आढळले. काही जागरुक प्रवाशांनी सरकत्या जिन्याची हाताळणी होत असलेल्या सेवा कक्षात कोणी कर्मचारी आहे का पाहिले तेथेही कोणी नव्हते.

सकाळची कामावर जाण्याची गडबड, त्यात सरकता जिना बंद राहत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. जिन्याच्या पायऱ्यांपेक्षा सरकत्या जिन्याने प्रवाशांना झटपट रेल्वे स्थानकात जाता येते. अनेक प्रवाशांना पायऱ्या असलेल्या जिन्याने चढणे त्रासदायक असते. काही प्रवाशांना हदयाचा त्रास असतो. त्यांना जिना चढणे शक्य होत नाही. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, वृध्द सर्रास सरकत्या जिन्याचा वापर करतात. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून डोंबिवलीतील पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी, एमआयडीसी, चोळे, ९० फुटी रस्ता वसाहत, ठाकुर्ली परिसरातील नागरिक येजा करतात. या स्थानकातून दररोज सुमारे एक ते दीड लाख प्रवासी करतात. जिना बंद असल्याने त्यांची कुचंबणा होते. सरकता जिना बंद असेल तर त्याचा अहवाल वरिष्ठांना कळविण्याचे काम स्थानक व्यवस्थापकांकडून केले जाते. त्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडून सरकता जिना तात्पुरता दुरुस्त करण्याचे काम केले जाते. परंतु, जिना वारंवार का बंद पडतो याचे कोणतेही कारण शोधले जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना आठवड्यातून दोन ते तीन वेळा बंद पडत असल्याने ठाकुर्लीतील एक जागरुक प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी थेट रेल्वे मंत्री, रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना याविषयी तक्रार केली आहे.