कल्याण : कोट्यवधी रूपये खर्च करून कल्याण शिळफाटा रस्त्याचे रूंदीकरण आणि सीमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. या कामांमुळे शिळफाटा रस्ता कोंडी मुक्त होईल असे वाटत असतानाच गेल्या दीड वर्षापासून कल्याण शिळफाटा रस्ता वाहन कोंडीचे आगर म्हणून ओळखला जाऊ लागला. नोकरदार, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी बस, मालवाहू वाहने दररोज तासन तास या कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे कल्याण शिळफाटा रस्ता, महापे खिंड, मुंब्रा वाय जंक्शन रस्ता, पत्रीपूल, मानपाडा भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.

या रस्त्यांवरील कोंडी सोडविण्यासाठी एक वाहतूक आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील उपस्थित होते. मुंबई, ठाण्याप्रमाणे नवी मुंबई, पनवेल परिसर हा उद्योग, व्यवसाय, सरकारी, खासगी आस्थापनांचे मोठे केंद्र आहे. बदलापूर, कर्जत, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरातून दररोज शेकडो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त नवी मुंबई, पनवेल परिसरात शिळफाटा रस्त्याने प्रवास करतात. तसेच, अंबरनाथ, तळोजा, डोंबिवली, भिवंडी औद्योगिक क्षेत्राचा पट्टा आहे. मालवाहु वाहतुकीवर हा व्यवसाय अवलंबून आहे. शिळफाटा भागात अनेक नामवंत शाळा आहेत. डोंबिवली, २७ गाव, कल्याण परिसरातील विद्यार्थी या शाळांमध्ये बसने शाळेत येतात.

या सर्व प्रवासी, उद्योजक, विद्यार्थी यांना शिळफाटा, मानपाडा जंक्शन, काटई ते पलावा चौक, कल्याण फाटा ते महापे खिंड रस्ता, मुंब्रा वाय जंक्शन रस्ता भागात दररोज होणाऱ्या वाहन कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा दोन ते तीन तास या रस्ते मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प असते. वाहतूक पोलिसांच्या आवाक्या बाहेर कोंडी गेल्याने तेही हतबल असल्याचे दृश्य या रस्त्यावर दररोज दिसते, असे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणले.

विविध प्रांतामधून मालवाहू वाहने शिळफाटा, अंबरनाथ परिसरातील रस्त्यावर आली की ती शिळफाटा भागात तासन तास अडकून पडतात. त्यामुळे काही उद्योग व्यावसायिक या भागातून आपले व्यवसाय हलविण्याच्या विचारात आहेत. कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना शिळफाटा परिसरातील रस्त्यांवरील कोंडीमुळे नोकरदार मेटाकुटीला आला आहे. यामध्ये महिला वर्गाची सर्वाधिक कुचंबणा होते. अनेक वेळा रुग्ण वाहिका या कोंडीत अडकून पडतात. कोंडीला कंटाळून कारवाई झाली तरी चालेल अनेक वाहन चालक उलट मार्गिकेतून प्रवास करतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. कोंडीमुळे विद्यार्थी शाळेत, घरी पोहचत नाहीत. त्यामुळे पालक, शिक्षण संस्था चालक त्रस्त आहेत.

शिळफाटा आणि परिसरातील रस्त्यांवरील वाहन कोंडीवर स्थानिक, जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या महत्वपूर्ण रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी आपण व्यक्तिश लक्ष घालावे. एक वाहतूक आराखडा या भागासाठी तयार करावा, अशी गळ माजी आमदार भोईर यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे.