ठाणे : हरियाणा राज्यात निर्मित होणाऱ्या मद्याचा साठा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. विजय बजाज (३६), रवि विश्वकर्मा (३६) अशी दोघांची नावे आहेत. या कारवाईत पथकाने २५ लाख ६३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मद्याचा साठा लपविण्यासाठी टेम्पोमध्ये कप्पा करण्यात आला होता. यातील मुख्य सुत्रधाराचा शोध उत्पादन शुल्क विभागाकडून शोध सुरू आहे.
हरियाणा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले मद्य राज्यात विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या महितीच्या आधारे, मुंबई नाशिक महामार्गावरील कल्याण बायपास भागात उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक एच.बी. यादव, रिंकेश दांगट, व्ही. व्ही. सकपाळ, साहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, जवान श्रीराम राठोड, हनुमंत गाढवे, नारायण जानकर, अमीत सानप, कुणाल तडवी, सागर चौधरी यांच्या पथकाने सापळा रचला. टेम्पो त्याठिकाणी आल्यानंतर तो टेम्पो पथकाने अडविला. त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये हरियाणा या राज्यातील निर्मित आणि विक्रीसाठी असलेला आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या विदेशी मद्यांच्या बाटल्यांनी भरलेले ५३ बाॅक्स आढळून आले. हा साठा लपविण्यासाठी त्यांनी वाहनामध्ये कप्पा तयार केला होता.
दरम्यान, याप्रकरणी पथकाने विजय बजाज आणि रवि विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले. तर यातील मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९० आणि १०३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.