ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता पाचशे खाटांवरून १ हजार खाटांपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, त्यापाठोपाठ शहरातील इतर पालिका रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच इतर नवीन रुग्णालये उभारणीसाठी पालिकेने पावले उचलली आहेत. यामुळे कळवा रुग्णालयावरील ताण कमी होण्याबरोबरच नागरिकांना चांगली आरोग्य उपचार सुविधा मिळण्याची चिन्हे आहेत.

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर नऊशे खाटांचे सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. तसेच ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुगणालय आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. हे रुग्णालय पाचशे खाटांचे आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत हे रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. रुग्ण उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना इतरत्र उपचारासाठी जावे लागत आहेत. तसेच या रुग्णालयाच्या कारभारावरून महापालिका गेल्या काही वर्षांपासून टिकेची धनी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाचा कारभार सुधारण्याबरोबरच क्षमता पाचशे खाटांवरून १ हजार खाटांपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय, ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील श्रीनगर परिसरात महापालिकेचे गंगुबाई शिंदे हे रुग्णालय आहे. खासगी लोकसहभागातून हे रुग्णालय चालविण्यात येते. त्याचबरोबर मुंब्रा येथील कौसा भागात महापालिकेने रुग्णालय उभारले आहे. हे रुग्णालयसुद्धा खासगी लोकसहभागातून चालविण्यात येणार आहे. पुढील वर्षात हे रुग्णालय सुरू करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हे दोन्ही रुग्णालय शंभर खाटांच्या क्षमतेचे असले तरी त्याठिकाणी आणखी शंभर अतिरिक्त खाटांची व्यवस्था तिथे निर्माण करण्याचा विचार पालिकास्तरावर सुरू आहे. त्याचबरोबर नळपाडा भागात पालिकेला सुविधा भुखंडातून उपलब्ध झालेल्या इमारतीमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याचा विचार पालिका स्तरावर असून या संबंधीचे प्रस्ताव पालिकेकडून तयार करण्याची कामे सुरू आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा – रस्ते प्रकल्पातील वर्ग-२ जमीनचे अडथळे दूर, जमीन मालकांना मोबदलाही मिळणार

हेही वाचा – पुनर्विलोकन यादीत निवृत्त, मयत कर्मचाऱ्यांचा समावेश, कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीनगर परिसरातील महापालिकेचे गंगुबाई शिंदे रुग्णालय आहे. हे रुग्णालय शंभर खाटांचे आहे. या इमारतीच्या पाठीमागेच पालिकेने एक इमारत विकत घेतली आहे. या इमारतीमध्ये शंभर अतिरिक्त खाटांची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत. मुंब्रा येथील कौसा भागात पालिकेने उभारलेले शंभर खाटांचे रुग्णालय नव्या वर्षात सुरू होणार असून याठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत शंभर अतिरिक्त खाटांची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत. शिवाय, नळपाडा भागात शंभर खाटांचे रुग्णालय उभारणीचा विचार सुरू आहे. या आरोग्य व्यवस्थेच्या विस्तारामुळे ठाणेकरांना रुग्ण उपचारासाठी कळवा रुग्णालयाव्यतिरिक्त विविध भागांत पाचशे खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.