ठाणे: कोपरी येथील आनंदनगर भागात शिंदे गट आणि भाजपमध्ये राडा झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाजपचे पदाधिकारी प्रमोद चव्हाण यांच्याविरोधात ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्रमोद चव्हाण यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर लिहील्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. त्यानंतर नरेश म्हस्के हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चव्हाण यांच्या कार्यालयामध्येही गेले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर चव्हाण यांच्या बाजूने ठाण्यातील भाजपचे एकही वरिष्ठ नेते कोपरी पोलीस ठाण्यात हजर नव्हते असे कळत आहे.

आनंदनगर या भागातून नरेश म्हस्के हे नगरसेवक म्हणून निवडून येतात. याच भागात भाजपचे प्रमोद चव्हाण हे देखील वास्तव्यास असून त्यांनी समाजमाध्यमावर एक मजकूर लिहीला होता. हा मजकूर म्हस्के यांच्या विरोधात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री म्हस्के यांचे कार्यकर्ते चव्हाण यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळेस नरेश म्हस्के सुद्धा होते, अशी माहिती समोर येत आहे. कार्यालयात गेल्यानंतर चव्हाण यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… महामुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीचा ताप, एकाच वेळी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने बिकट स्थिती

दरम्यान,तक्रार देण्यासाठी मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्याचे कळते आहे.

हेही वाचा… ठाणे जिल्हा रुग्णालयाचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपुजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार भूमिपूजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी कोपरी येथे समाजमाध्यमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली होती. परंतु याप्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर संपूर्ण राज्यभर गाजलेले रोशनी शिंदे प्रकरणही समाजमाध्यमावरील टिकेतून घडले होते. यात शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा दावा रोशनी हिने केला होता. यातही केवळ एनसी दाखल करण्यात आली आहे.