दिवा रेल्वे स्थानकात मोटारमनच्या डब्यात शिरल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे कलम कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवा स्थानकात सकाळी ६.२३ ला येणारी लोकल उशिरा आली. त्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. दरम्यान, संबंधित ३० वर्षीय तरुणीने व्हिडीओद्वारे दिव्यातील रेल्वे प्रवासाविषयी जीवघेणी व्यथा विषद केली आहे.
“जलद रेल्वेगाडी फलाट क्रमांक चार ऐवजी दोनवर आली. त्यामुळे फलाट क्रमांक दोनवर गर्दी झाली. या गर्दीत काही महिला फलाटावर पडल्या. तेवढ्यात लोकल सुरू झाल्याने आम्ही मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला”, अशी माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >> मोटारमनच्या डब्यात प्रवेश करून लोकल अडविणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
“खोपोलीहून सुटणारी लोकल २५ मिनिटे उशिरा आली. ही लोकल जलद असल्याने फलाट क्रमांक चारवर येणं अपेक्षित होतं. परंतु, ती लोकल फलाट क्रमांक २ वर आली. गाडी फलाट क्रमांक दोनवर येत असातना घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. फलाटावर गर्दी झाल्याने, ट्रेन थोडावेळ थांबवण्याची आम्ही विनंती केली. परंतु, मोटरमनने आमची विनंती ऐकली नाही. त्यामुळे आम्ही मोटरमनच्याच केबिनमध्ये चढलो. आम्ही केबिनमध्ये प्रवेश केल्याने अडचण निर्माण झाली होती तर त्यांनी गाडी फलाटावर असतानाच आम्हाला उतरायला सांगायला हवं होतं. आम्ही उतरलो असतो. परंतु, फलाट सोडल्यानंतर त्यांनी ट्रेन थांबवली. जिथून उतरायला जागा नव्हती तिथेच आम्हाला उतरायला सांगितलं”, यावरून तरुणीने संताप व्यक्त केला.
“तरीही आम्ही खाली उतरलो आणि तिथूनच मागच्या डब्यात प्रवेश केला. यात आमची चूक काय?” असा सवालही तिने उपस्थित केला. “आमच्यासाठी गाड्या थांबवल्या जात नाहीत. बायका गाडीतून पडतात. विनंती करूनही त्यांनी ट्रेन थांबवली नाही. कुर्ल्यावरून आम्हाला ताब्यात घेण्यात आलं. परंतु, हे प्रकरण दिव्याचं असल्याने आम्हाला पुन्हा येथे पाठवण्यात आलं”, अशीही व्यथा तरुणीने मांडली.
बायका एकमेकांना तुडवून ट्रेनमध्ये प्रवेश करतात
“दिव्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे दिव्यातून लोकल सोडली पाहिजे. लांब पल्ल्यांच्या लोकलना दिव्यात थांबा दिला जातो. या लोकल आधीच भरून आलेल्या असतात. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांना जागा मिळत नाही. बायका एकमेकांना तुडवून ट्रेनमध्ये प्रवेश करतात. रेल्वे प्रशासनाने आमची विनंती मान्य करावी”, असंही आर्जव या तरुणीने केलं आहे.
जास्तीत जास्त लोकल दिव्यात थांबवा
“दिवा स्थानकात जी घटना घडली ती कोणत्या परिस्थितीत घडली हे पाहणं गरजेचं आहे. गर्दीच्या वेळी दिवा स्थानकातून प्रवास करणे किती धोकादायक आहे, हे येथे आल्यावर कळतं. दिवा स्थानकातील प्रवाशांचा अंत पाहू नका. गर्दीच्या वेळी मरणयातना सहन करून प्रवास केला जातो. त्यामुळे दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याची आमची मागणी आहे. पाचव्या सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण होऊनही दिवा-सीएसएमटी लोकल सुरू झालेली नाही. लांब पल्ल्याच्या ट्रेनला दिव्यात थांबा देण्यात आला आहे. परंतु, जास्तीत जास्त जलद लोकलना दिव्यात थांबा दिला पाहिजे”, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत यांनी केली आहे.
दिव्यात रेल रोको नाही
महिला प्रवासी मोटरमन केबिनमध्ये चढल्याने तिला उतरवण्यासाठी लोकल थांबवण्यात आली होती. ट्रेन थांबल्याने या लोकलसमोर प्रवाशांची गर्दी झाली. त्यामुळे दिव्यात रेल रोको झाल्याचे वृत्त पसरले. परंतु, दिव्यात रेल रोको झाले नसल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून स्पष्ट करण्यात आले आहे.