कल्याण – अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील विविध भागात जलमय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे १०४ नागरिकांच्या जीविताचा विचार करून त्यांचे विविध भागातील संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले. यात नेतिवली टेकडी, काटेमानिवली, वालधुनी, आयरे गाव समतानगर परिसरातील नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कल्याण परिसरात एकूण ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कल्याण शहर परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून घरात घुसले आहे. अशा नागरिकांना घरात निवास करणे शक्य नसल्याने आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून तहसीलदार शेजाळ यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी घरात पाणी शिरलेल्या रहिवाशांचे परिसरातील संक्रमण शिबिरात स्थलांतर केले आहे. या रहिवाशांच्या भोजन, निवासाची व्यवस्था महसूल, पालिकांकडून करण्यात आली आहे.
कल्याण मधील नेतिवली टेकडी येथे एक जुनाट झाड उन्मळून पडले आहे. या झाडामुळे टेकडी परिसरातील नागरी वस्तीला धोका निर्माण होऊ शकतो याचा विचार करून झाड कोसळलेल्या भागातील १२० रहिवाशांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या नेतिवली येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. डोंबिवलीतील आयरे गावातील समता नगर भागात खाडीचे पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील अनेक चाळी जलमय झाल्या आहेत. पुराचे पाणी घरात घुसलेल्या या भागातील ७० रहिवाशांना पालिकेच्या आयरे गावातील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. काटेमानिवली येथील वृंदावन शिवकृपा चाळीत पुराचे पाणी शिरले आहे. या भागातील १० नागरिक आणि वालधुनी शिवाजीनगर भागातील चार रहिवाशांची काटेमानिवली येथील जायभाय शाळा, गणपती मंडपात व्यवस्था करण्यात आली आहे.
शिळफाटा रस्त्यावरील काटई गावातील दहा घरे, ११ गाळ्यांमध्ये पाणी शिरले आहे. काटेमानिवली शिवाजीनगर वालधुनी येथे १२ घरात पाणी शिरले आहे. मौजे नांदिवली साई कमल सोसायटीतील तळमजल्यावरील सोळा खोल्या पाण्याखाली गेल्या आहेत. भोपर येथे चाळीतील दहा घरांचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. वालधुनी अशोकनगर भागात सहा घरात पाणी शिरले आहे. कल्याण ठाणकरपाडा येथे घराची भिंत कोसळली. जीवित हानी झाली नाही, अशी माहती तहसीलदार शेजाळ यांनी दिली.
कल्याण तालुक्यातील दहागाव येथील चंद्रा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उल्हास नदीवरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वालकस येथील पूल पाण्याखाली गेला आहे. याठिकाणी पर्यायी रस्ते मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तालुक्यात दिवसभरात मानवी, पशुधनाची जीवित हानी झालेली नाही, असे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले.
निळजेत पाण्यातील प्रवाशांची सुटका
निळजे गाव येथील रेल्वे बोगद्यातील साचलेल्या पाण्यात अडकलेल्या वाहनातील दोन प्रवाशांची दोन तरूणांनी सुखरूप सुटका केली. हे वाहन बोगद्यात मागून पुढे असे उलटे झाले होते. त्यामुळे वाहन चालकासह एक प्रवासी वाहनात अडकून पडला होता. हळुहळू वाहनात पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती. निळजेतील दोन तरूणांनी मोटारीचा मागचा भाग जोराने दाबल्याने वाहनातील प्रवासी सुखरूप बाहेर पडले. नंतर हे वाहन जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.