|| भगवान मंडलिक

शिळफाटा येथील कोंडी फोडण्यासाठी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची निर्मिती;- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या नाहूर (भांडुप)-ऐरोली-निळजे(काटई नाका)-बदलापूर द्रुतगती रस्त्याचे काम जोमाने सुरू झाले आहे. या रस्त्यावरील मुंब्रा येथील भारत गिअर ते डायघर दरम्यान बोगदा बांधण्यात येणार आहे. या बोगद्याचे काम प्राधिकरणाने हाती घेतले आहे. आतापर्यंत बोगद्याचे २० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे, असे प्राधिकरणाच्या पर्यवेक्षक अभियंत्यांनी सांगितले.

रस्त्याचे काम जमिनीवरून आणि काही ठिकाणी पूल अशा स्वरूपाचे आहे. हे काम सुरू केल्यानंतर त्यास विलंब लागणार नाही. या मार्गावरील मुंब्राजवळील भारत गिअर ते डायघर दरम्यानचा डोंगर फोडून तेथून रस्ता तयार करायचा आहे. हे काम खूप आव्हानात्मक आहे. या ठिकाणचा डोंगर पूर्ण पाषाणाचा आहे. हे काम करताना अनेक नैसर्गिक, तांत्रिक अडथळे येत आहेत. रस्ते काम सुरू झाल्यानंतर बोगद्याचे काम झाले नाही. रस्ते कामात अडथळा नको म्हणून या रस्त्यावरील बोगद्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे, असे अभियंत्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील लोकसंख्या २०३१ पर्यंत ३४ टक्केने वाढणार आहे. १९९६ पासून ते २००५ पर्यंत प्राधिकरण क्षेत्रातील वाहन संख्या १४ लाखांने वाढली आहे. ही वाहन संख्या येत्या काळात वाढत राहणार आहे. मुंबईत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी सध्या पश्चिम दहिसर, भिवंडी, ऐरोली, वाशी ही चार प्रवेशद्वारे आहेत. पुढील काळ लक्षात घेऊन घेऊन प्राधिकरणाने नाहूर ते बदलापूर (महामार्ग क्र. १४) हा ३३.८ किलोमीटरचा १० मार्गिकांचा रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. पुणे, कर्जत, बदलापूर, कल्याण परिसरातील वाहनांना या मार्गिकेने मुंबईत जाणे आणि बाहेर पडणे सुलभ होणार आहे. या कामासाठी ७३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिळफाटा कोंडीला पूर्णविराम?

शिळफाटा दत्तमंदिर चौक, डायघर पोलीस स्थानक, महापे रस्ता खिंड भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याची योजना तयार आहे.  शिळ कल्याण फाटा चौकात कल्याण, डोंबिवली दिशेने येणारी वाहने तुर्भे दिशेने जाण्यासाठी खिंडीच्या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून येणारी आणि कल्याणकडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने थेट निघून जातील.

शिळफाटा चौकातील दत्त मंदिरचा काही भाग मागे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या मंदिरा जवळएका जमीनदाराची जमीन होती. तिचा टीडीआर त्या मालकाला देऊन जमीन रुंदीकरण कामासाठी ताब्यात घेण्यात आली आहे, असे कल्याण ग्रामीणचे स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले. दत्त मंदिर मागे गेल्याने चौकातील रस्ते प्रशस्त करणे आणि या मार्गातील वळण काढणे शक्य होणार आहे. भारत गिअर ते डायघर पोलीस ठाणे (हनुमान ढाबा) दरम्यान भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शिळफाटा दत्त मंदिर चौकातील पुलामुळे पुण्याकडून मुंब्य्राकडे जाणारी आणि येणारी वाहने पुलाखालून न थांबा घेता निघून जातील. भुयारी मार्ग, पूल, रस्तारुंदीकरण यामुळे शिळफाटा चौकातील वाहन कोंडीला येत्या दोन वर्षांत पूर्ण विराम मिळेल, असे आमदार भोईर यांनी सांगितले.