मार्च, एप्रिलमध्ये जंगलांना वणवे लावून ती खाक करून टाकायची. जंगलातील गवत, झुडपे नष्ट झाली की दिवस, रात्र जंगलांमध्ये जाळी, सापळे लावून जंगली प्राण्यांच्या शिकारी करण्याची अनेक वर्षापासूनची प्रथा ठाणे जिल्ह्याच्या डोंगराळ दुर्गम भागात आहे. वन अधिकारी अशा शिकारींच्या मागावर होते. शिकारी वेळोवेळी अधिकाऱ्यांना चकवा देत होते. दरम्यान शहापूरजवळील आवरे गावाजवळील जंगलात एका रानडुकराची शिकार करणाऱ्या १० शिकारींना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

अनेक वर्षानंतर प्रथमच जंगली प्राण्यांची शिकार करणारे वन विभागाच्या जाळ्यात सापडल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले. गणेश धर्मा बरोरा, जितेंद्र किसन बरोरा (रा. पेंढरघोळ), जयराम देहू भगत (रा. मेंगाळपाडा) यांच्यासह इतर सात जणांना पोलिसांनी अटक केली.

शहापूरचे वनक्षेत्रपाल प्रकाश चौधरी, आटगाव वनाधिकारी यांना शहापूर जवळील आवरे जंगल हद्दीत रात्रीच्या वेळेत काही शिकारी येणार असल्याची माहिती मिळाली होती. वनाधिकाऱी आवरे जंगलात झुडपांचा आधार घेऊन संध्याकाळी जाऊन बसले. त्यांना दोन इसम जंगलात संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसले. काही क्षणात ते जंगलातून दिसेनासे झाले. रात्रभर पाळत ठेऊनही शिकारी आले नाहीत. पहाटे गणेश धर्मा बरोरा (बंड्या) जंगलात संशयास्पदरीत्या फिरत होता. वनाधिकाऱ्यांना पाहताच त्याची बोबडी वळली. त्याची चौकशी केली असता, त्याने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी कुजलेल्या मांसामध्ये स्फोटके भरून दोन ठिकाणी ठेवली आहेत, अशी माहिती दिली.

गणेशने दिलेल्या माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी जितेंद्र बरोरा, जयराम भगत यांना अटक केली. त्यांच्यावर आटगाव चौकीत वन कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. शहापूर न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना वन कोठडी सुनावली.

जितेंद्र, जयराम व त्यांच्या साथीदारांनी आटगाव वनक्षेत्रात एका रानडुकाराची शिकार केली असल्याची माहिती आरोपींच्या तपासातून पुढे आली. वनाधिकाऱ्यांनी रात्री दोन वाजता मेंगाळपाडा येथील जयरामच्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरात रानडुकराचे मांस गरम पाण्यात उकळत ठेवले असल्याचे दिसले. प्राण्यांना पकडण्यासाठी लागणारी आठ जाळी (वाघूर) घरात होती. रानडुकारच्या शिकारीतील हे तीन जण मुख्य आरोपी असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. या शिकाऱ्यांनी किती प्राण्यांच्या शिकारी केल्या आहेत, याचा तपास वनाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या शिकाऱ्यांची लवकर चौकशी, आरोपपत्र तयार करून त्यांना न्यायालयात कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने वनाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत. शिकाऱ्यांना अटक करण्याच्या मोहिमेत वासिंदचे वनपाल सुनील भोंडीवले, आटगावचे वनपाल के. टी. बागुल, वनरक्षक मंगेश शिंदे, सेमेल भोसले, प्रवीण विशे, जयसेन गावंडे, चंद्रप्रकाश मोर्या, संदीप जाधव, दादाभाई पाटील, रूपाली सोनावने, इंदुमती बांगर, कविता बेणके, वनमजूर मधुकर घरत, चालक भरत निचिते, राजेश गोळे सहभागी झाले होते.