अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमर दादामिया इंजिनियर आणि भाजपच्या माजी नगरसेविका दिपा गायकवाड यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात शिवसेनेला आणखी बळ मिळेल अशी शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिवसेनेचा विस्तार वेगाने होत असून विविध पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. आगामी महापालिका, पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्वाच्या नेत्यांच्या माध्यमातून विभाग निहाय आढावा बैठकांचे सत्र सुरू आहे. तर विविध पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश देखील होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकताच अंबरनाथ पश्चिमेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमर दादामिया इंजिनियर आणि भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका दिपा गायकवाड यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करण्यात आले.
अंबरनाथ शहरात शिवसेना एक मजबूत पक्ष आहे. यापूर्वी पालिकेत शिवसेनेचीच सत्ता होती. शहरात भाजपचे विस्तारण्यास सुरुवात केली आहे. भाजपने गेल्या काही महिन्यात पालिका प्रशासनाचे विविध मुद्द्यांवर वाभाडे काढले आहेत. मोर्चा आणि आंदोलनाच्या निमित्ताने पालिकेला जाब विचारला आहे. गेल्या पाच वर्षात पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी शिवसेनेचेच वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेलाच लक्ष्य केल्याचे बोलले जाते. मात्र शिवसेनेनेही शहरात पुन्हा ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या पालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
