लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : दिवा शहराध्यक्ष पदावरून अचानकपणे हटविण्यात आल्यामुळे नाराज असलेले भाजपचे माजी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. मुंडे यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने दिव्यात ठाकरे गटाने भाजपला धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाणे जिल्ह्यात संघटनात्मक जाळे मजबुत करण्यासाठी नुकतीच जिल्हा कार्यकारणी जाहिर केली आहे. यामध्ये ३० जुन्या तर ७० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात भाजपचे माजी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांना हटवून त्यांच्या जागी सचिन भोईर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंडे हे सातत्याने शिंदे गटाविरोधात भूमिका घेत होते. अचानकपणे पदावरून हटविल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दिव्यात शिंदे गटाच्या दबावाखाली भाजपच्या पक्ष संघटनेचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर भाजपच्या ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. असे असतानाच, शनिवारी त्यांनी आपल्या समर्थकांसोबत मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला.
आणखी वाचा-ठाकुर्लीतील हनुमान मंदिराजवळील रस्ता पेव्हर ब्लॉक कामासाठी पंधरा दिवस बंद
भाजप पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करत होतो. पण, नवीन जिल्हाध्यक्षांना पक्ष वाढवायचा नसून शिंदे गटाच्या सांगण्यानुसार पक्ष चालवायचा असल्याने आम्हाला डावलण्यात आले. त्यामुळे आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया रोहिदास मुंडे यांनी दिली.