कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या. या सुविधांअभावी सामान्य गोरगरीब रूग्ण तडफडून मरत असतील तर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रुग्णालयाला प्रशासनाला दिला.
कल्याण पूर्वेतील सविता बिराजदार (४३) या महिलेवर पक्षघात आणि ब्रेन स्ट्रोक आल्याने अत्यवस्थ असल्याने पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपाचार सुरू होते. सोमवारी दुपारी या महिलेची प्रकृती गंभीर झाली. पालिका रुग्णालयातील डाॅक्टरांनी सविताच्या कुटुंबीयांना त्यांना कळवा येथे तातडीने हलविण्याची सूचना केली.
दुपारपासून ते संध्याकाळी पाच तासाच्या कालावधीत सविताच्या कुटुंबीयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास रुग्णालय प्रशासन आणि खासगी रुग्णवाहिका चालकांनी कमी भाड्यामुळे सहकार्य न केल्याने अखेर सविता यांचा रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात सोमवारी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सविताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
नगरसेवकाकडून खडेबोल
रुक्मिणीबाई रुग्णालयात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे समजताच माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी मंगळवारी सकाळी रुक्मिणीबाई रुग्णालयात येऊन रुग्णालयातील डाॅक्टरांची हजेरी घेतली. रुग्णालयात अति दक्षता विभाग नाही.आयसीयु यंत्रणा बंद, पुरेसे मनुष्यबळ नाही. डाॅक्टर नाहीत. मग या रूग्णालयात सामान्य, गरीब रुग्णालयांना मरण्यासाठी दाखल करून घेता का. वैद्यकीय सुविधांअभावी गरीब रुग्ण येथे मरणार आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांनी येथे येऊ नये, असा फलक रुग्णालयाबाहेर लावा म्हणजे गरीब रुग्ण येथे येणार नाहीत, असे गायकवाड यांनी उपस्थित डाॅक्टरांना सुनावले. रुक्मिणीबाई रुग्णालयातील कमतरता असलेल्या वैद्यकीय सुविधांची यापूर्वीच मागणी वरिष्ठांकडे केली आहे. त्याचा पाठपुरावा केला जात आहे, असे उपस्थित डाॅक्टरांनी सांगितले.
चालकांची मनमानी
रुक्मिणीबाई रुग्णालयात एकूण चार रुग्णवाहिका आहेत. फक्त एक चालू स्थितीत असते. उर्वरित तीन भंगार किंंवा कोठेतरी अपघात करून बंद पाडण्यात आलेल्या असतात. या रुग्णवाहिकेवरील चालकांना रुग्णालयात मामा बोलतात. रुग्णालयातील कायमस्वरुपी रुग्णवाहिका चालक रुग्ण कितीही गंभीर असला तरी आम्हाला आता भोजन करायचे आहे. रुग्ण खूप गंभीर आहे का.
गंभीर रुग्णासोबत आणखी एक दोन रुग्ण मिळाले की मग कळवा किंवा मुंबईला जाऊ, अशी उद्दाम भाषा नेहमी करत असतात. या दोन चालकांना रुग्णालय प्रशासन नेहमी पाठीशी घालते, अशा रुग्ण नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.सविता बिराजदार अत्यवस्थ आहेत. हे माहिती असुनही पालिका रुग्णवाहिका चालक आणखी दोन रुग्ण मिळाले की मग कळवा येथे जाऊ, अशी भाषा रुग्णालयात करत होता. त्यामुळे रुक्मिणीबाई रुग्णालयातील मनमानी करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्ण नातेवाईक करत आहेत. आपण अडचणीत येऊ समजताच एक चालकाने आजाराचे सोंग घेतले असल्याचे समजते.
आपण याप्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच आहेत. यासाठीच उपायुक्ताच्या बैठकीला जात आहोत, असे रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप पगारे यांनी सांगितले.