लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळील नानानानी पार्कमधील कारंजे मागील अनेक महिन्यांपासून बंद होते. अनेक नागरिक हे कारंजे सुरू करावेत म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेकडे प्रयत्नशील होते. याविषयीच्या तक्रारी प्राप्त होताच पालिकेच्या डोंबिवली विभागाच्या उद्यान विभागाने गुरुवारी हे कारंजे सुस्थितीत करून सुरू केले.

मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळील नानानानी पार्क डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. याठिकाणी नागरिक सकाळ, संध्याकाळ अधिक संख्येने फिरण्यासाठी येतात. आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक पालक आपल्या मुलांना आजी, आजोबा नातवंडांना घेऊन या उद्यानात फिरण्यासाठी येतात. उद्यानात कारंज्यांची सुविधा असुनही ते सुरू नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत होते. मुलांनाही उद्यानातील कारंजे मोठा विरंगुळा होता. विविध रंगी उडणारे कारंजे लक्षवेधी असल्याने मुलांच्या मनोरंजनाचे मोठे साधन होते. मागील अनेक महिन्यांपासून हे कारंजे बंद असल्याने नागरिकांनी याविषयी अनेक तक्रारी पालिकेत केल्या होत्या.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्वच उद्याने देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी खासगी ठेकेदाराला पालिकेने दिली आहेत. पालिकेने कितीही प्रयत्न केले तरी ठेकेदार पुढाकार घेत नाही तोपर्यंत उद्यानांमधील देखभाल दुरुस्तीची कामे मार्गी लागत नाहीत, असा नागरिकांचा अनुभव आहे. गावदेवी मंदिर येथील नानानानी पार्कमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या बालगोपाळ, शाळकरी मुलांची संख्या वाढली आहे. मनोरंजनाचे अन्य कोणतेही साधन या नानानानी पार्कमध्ये नसल्याने या उद्यानातील कारंजे सुरू करावेत म्हणून नागरिकांनी उद्यान विभागाचे डोंबिवली विभागाचे अधीक्षक महेश देशपांडे यांच्याकडे मागणी केली होती.

अधीक्षक देशपांडे यांनी तात्काळ उद्यान देखभाल ठेकेदाराशी संपर्क साधला. त्यांना तातडीने मानपाडा रस्त्यावरील नानानानी पार्कमधील कारंजे सुस्थितीत करण्याचे आदेश दिले. हे काम अधीक्षक देशपांडे यांनी गुरुवारी ठेकेदाराकडून स्वता उभे राहुन करून घेतले. गुरुवारी संध्याकाळी नागरिक उद्यानात येताच त्यांना नानानानी पार्कमधील कारंजे सुरू झाल्याचे दिसताच त्यांनी समाधान व्यक्त केले. अनेक शाळकरी मुले उद्यानात कारंजाचे उडणारे पाणी हातावर, अंगावर घेण्यासाठी धावाधाव करत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांना उद्यानात आणले की त्यांना मनोरंजनासाठी काही असले की मग त्यांच्यामागे फार पळावे लागत नाही, असे आजी, आजोबांनी सांगितले. पालिकेने सुट्टीच्या कालावधीत हे कारंजे सुरू करून चांगले काम केले आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. नाना नानी पार्कमधील कारंजांची नियमित देखभाल करण्यात येईल. ते सुस्थितीत राहतील याची काळजी ठेकेदाराकडून घेण्यात येईल, असे उद्यान विभागाचे अधीक्षक महेश देशपांडे यांनी सांगितले.