ठाणे : दिवा येथे महिलेने तिच्या साडे चार वर्षांच्या मुलीला जमीनीवर आपटून तिला उलथण्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर महिलेविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिच्याविरोधात पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया केली जात आहे.

मुंबईतील वडाळा भागात मारहाण करणारी महिला तिची सासू, साडेचार वर्षांची मुलगी, पतीसोबत राहत होती. परंतु काही महिन्यांपूर्वी ती परिसरातील एका व्यक्तीसोबत घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर ती त्या व्यक्तीसोबत दिवा येथील साबेगाव भागात वास्तव्य करत होती. महिला घर सोडून निघून गेल्यानंतर तीन महिन्यांनी तिने तिच्या साडे चार वर्षांची मुलीला देखील दिवा येथे तिच्यासोबत राहण्यास नेले होते. दरम्यान, रविवारी मुलीच्या आजीला एका महिलेने मोबाईल चित्रीकरण पाठविले होते. त्यामध्ये तिची सून तिच्या साडे चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण करत होती. तसेच तिला जमीनीवर आपटत आणि केस ओढून घेऊन जात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित मुलीला तिची सावत्र भावंडे वाचवित होती. परंतु ती त्यांचे देखील ऐकत नव्हती. मुलीच्या आजीने तात्काळ मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या दिवा पोलीस चौकीमध्ये धाव घेतली. तिने तिच्या सूनेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयत नेले. उपचारानंतर मुलीला तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित चित्रीकरण महिलेच्या दुसऱ्या पतीच्या १७ वर्षीय मुलीने काढले आहे. हे चित्रीकरण जतन करण्यात आले असून जबाब नोंदविण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.