ठाणे : छत्तीसगड येथील चार जणांना भिवंडी येथील पडघा भागात डांबून त्यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्तीसगड येथील सुरजपूरचे जिल्हाधिकारी रोहित व्यास यांनी याबाबत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या वेठबिगारींचा शोध घेऊन त्यांची सुटका केली. इंद्रपाल जगन्नाथ सिंग (३०), विकेश उत्तम सिंग (१७), बादल सोवित सिंग (१४) आणि मनबोध धनि राम (४९) अशी या वेठबिगारींची नावे आहेत. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

छत्तीसगढ राज्यातील सुरजपुर जिल्ह्यात राजकुमारी सिंग राहतात. त्यांचे पती इंद्रपाल यांना मुंबई येथे एका ठेकेदाराने डांबून ठेवल्याची तक्रार त्यांनी सुरजपुर जिल्हाधिकारी रोहित व्यास यांच्याकडे केली होती. यानंतर त्यांनी तात्काळ संपूर्ण प्रकरणाची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिली. शिनगारे यांनी याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देऊन कारवाईचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम इंद्रपाल यांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो भिवंडी जवळील पडघा भागात असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी पडघा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध घेण्यास सुरूवात केली. बोअरवेलसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी इंद्रपाल यांचा शोध लागला. इंद्रपाल याच्यासोबत विकेश, बादल आणि मनबोध हे देखील आढळून आले. त्यांची चौकशी केली असता, ते कविन मनिवेल यांच्याकडे बोअरवेलच्या कामासाठी खड्डे खोदण्याचे आणि विद्युत जोडणी करण्याचे काम करतात, असे समजले.

हेही वाचा – महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती

हेही वाचा – तर मी उद्धव सेनेत जायला तयार – आमदार शहाजी पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामगारांनी सांगितले की, कविन याने त्यांना चार महिन्यापासून वेतन दिले नाही. वेतनाचे पैसे मागितले असता त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत खड्डे खणण्याचे काम करून घेतले जात आहे. आम्ही आमच्या घरी जातो, असे सांगितल्यानंतरही आम्हाला घरी सोडले जात नव्हते. यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी संबंधित ठेकेदार कविन मनिवेल यांच्या विरोधात वेठबिगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर चारही जणांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.