लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : तलावपाली येथील एका सराफाच्या दुकानातून कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांचा अपहार दुकानातील कर्मचाऱ्याने केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातून १ कोटी ५ लाख ५५ हजार ७६६ रुपयांचे ७० दागिने गायब आहेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.

तलावपाली येथील डॉ. मूस रोड परिसरात सराफाचे भव्य दुकान आहे. या दुकानात एकूण २४ कर्मचारी काम करतात. दुकानाचे मालक हे दररोज विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांची आकडेवारी कर्मचाऱ्यांकडून घेत असतात. ८ मार्चला दुकान बंद झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी सोन्याच्या दागिन्यांची माहिती मालकांना दिली.

आणखी वाचा-कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९ मार्चला दुकान उघडले असता, एक कर्मचारी अर्धवेळ काम करून निघून गेला. त्याच्या विभागातील दागिन्यांची पडताळणी करण्याची सूचना मालकाने इतर कर्मचाऱ्यांना दिली. त्यावेळी २४० सोन्यांच्या हारांपैकी ३८ हार, १४५ कर्णफुलांपैकी २४ जोडी कर्णफुले, २४ सोनसाखळ्यांपैकी तीन, २२ सोन्याच्या बाजुबंद पैकी पाच असे एकूण ७० दागिने कमी आढळून आले. या दागिन्यांची किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार ७६६ रुपये इतकी आहे. याप्रकरणी सराफा दुकानाच्या मालकाने रविवारी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.