राज्यातील अवकाळी पावसाचा मोठा फटका कृषिमालाच्या उत्पादनाला बसल्यामुळे भाज्या, फळे, डाळींच्या दरात गेल्या पंधरवडय़ापासून मोठी वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील किरकोळ बाजारांत ओल्या दुष्काळाच्या नावाने ग्राहकांची लूट सुरू आहे.
गेल्या महिनाभरापासून कांद्याचे वाढलेले दर अजूनही आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नसून, किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे ७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इतर भाज्यांच्या दरातही पाच ते दहा रुपयांची वाढ झाली असून डाळीही शंभरीपार गेल्या आहेत.
मुंबई, ठाणे परिसरांत पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणावर कृषिमालाची आवक होते. पावसाळा संपताच साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून शहरी भागास कृषिमालाचा पुरवठा होतो. त्यामुळे दिवाळीनंतरचा काळ एरव्ही कृषिमालाच्या स्वस्ताईसाठी ओळखला जातो. यंदा मात्र राज्यातील अवकाळी पावसामुळे हे गणित पूर्णपणे बदलले आहे.
ओल्या दुष्काळाच्या नावाने..
वाशी तसेच कल्याण येथील कृषी बाजार समितीमध्ये भाज्यांच्या घाऊक दरात किलोमागे चार ते पाच रुपयांची वाढ झाल्याने किरकोळ बाजारात चढय़ा दराने विक्री सुरू झाली आहे. मुंबई, ठाण्याच्या काही किरकोळ बाजारांमध्ये ओल्या दुष्काळाच्या नावाने ग्राहकांची लूट सुरू असून कांदा, बटाटा, कोथिंबीर, भेंडी, फरसबी, कोबी, फ्लॉवर या भाज्यांसह द्राक्षे, कलिंगड, सीताफळ ही फळेही चढय़ा दरांनी विकली जात आहेत. बाजरी, गहू, ज्वारी यांसारख्या धान्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे डाळींनीही शंभरी गाठल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. दीड महिन्यात डाळींच्या दरात किलोमागे १५ ते २० रूपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात भाज्यांमध्ये प्रति किलोमागे ५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे, तर अन्नधान्यांमध्ये प्रति किलोमागे ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे.
कांद्याचा पुरवठा कमी..
परतीच्या पावसाचा मोठा फटका कांद्याला बसला असून कांद्याच्या चाळींमध्ये पाणी शिरल्याने वाशी बाजारात कांद्याने भरलेल्या जेमतेम ३० ते ४० गाडय़ा दररोज येत आहेत, अशी माहिती तेथील व्यापाऱ्यांनी दिली. यामुळे येथील घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ५५ रुपये किलो या दराने विकला जात असून किरकोळ बाजारात ७५ रुपयांनी कांद्याची विक्री सुरू आहे.
फळे घाऊक किरकोळ
अननस ४० १००
चिकू ३५ ५०
डाळिंब ८० २००
सीताफळ ६० २००
मोसंबी ६५ १२०
संत्री ४० ८०
डाळी घाऊक किरकोळ
उडीद ७८ ११०
तूर ९० ११०
मूग ९५ १०८
मसूर ५४ ८८
हरभरा डाळ ६२ ७५
झाले काय? : पुणे, नाशिक तसेच राज्यातील इतर भागांतून मुंबईस होणारी कृषिमालाची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याने घाऊक तसेच किरकोळ दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांपासून वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रावणापासूनच भाज्यांचे दर चढणीला लागले. ऑक्टोबरनंतर या दरांमध्ये घसरण होईल, असा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात होता. मात्र, परतीचा पाऊसही लांबल्याने कृषिमालाचे दर पूर्वीपेक्षा वाढले आहेत, अशी माहिती वाशी येथील घाऊक बाजारातील व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
कोथिंबिरीची आवक घटली.. अवकाळी पावसामुळे ऐन काढणीस आलेल्या कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाल्यामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोथिंबिरीची आवक घटली आहे. सध्या कोथिंबिरीची विक्री प्रति जुडी घाऊक बाजारात ४० रुपयाने, तर किरकोळ बाजारात ८० रुपयांनी होत आहे. आठवडाभरात कोथिंबिरीमध्ये किरकोळ बाजारात ४० रुपयांनी वाढ झाली आहे. नाशिक, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागांतून राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये कोथिंबीर विक्रीसाठी दाखल होते. कोथिंबिरीचे पीक बाराही महिने घेतले जात असले तरी वातावरणातील असमतोलामुळे कोथिंबिरीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी किरण मुळे यांनी सांगितले.
किरकोळ दर
(प्रति दर किलो)
धान्य घाऊक किरकोळ
* गहू २९ ४४
* ज्वारी ५० ७०
* बाजरी ३२ ४०
* तांदूळ २८ ते ३६ ते ५० ७६
* मका ३० ४०
भाज्या घाऊक किरकोळ
* भेंडी ३६ ८०
* फरसबी ३० ४०
* कोबी २० ३०
* फ्लॉवर १६ ५०
* कारली २४ ८०
* घेवडा ३५ ८०
* तोंडली ४५ ७०
* वांगी २४ ८०
* पालक १० ३०
* कोथिंबीर ४० ८०
* मेथी २५ ३०
