reels, career, passion / ठाणे : करिअर घडवण्यासाठी आवड, सातत्य आणि प्रामाणिक शिक्षण आवश्यक आहे. एखादी रिल्स बघून नृत्य करणे म्हणजे कलेचा अपमान आहे. रिल्स करणे म्हणजे करिअर नाही असे मत नृत्यदिग्दर्शिका आणि नृत्यांगना फुलवा खामकर यांनी व्यक्त केले. नृत्यामध्ये करिअर घडवायचे असेल, तर किमान दोन वर्षाचे या क्षेत्रात प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांच्यावतीने करिअर कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहावे पुष्प गुंफण्यात आले. कार्यक्रमात ‘नृत्यदिग्दर्शन – आवड, कौशल्य आणि व्यावसाय संधी ’ या विषयावर नृत्यांगना फुलवा खामकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खामकर यांनी आपल्या प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले, शालेय आणि महाविद्यालयीन काळात मी नृत्य करत होते.
पण घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मोठ्या नृत्यशाळेत प्रशिक्षण घेता आले नाही. दहा वर्षे जिम्नॅस्टिकमध्ये मेहनत घेतली. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर मी पदवी पूर्ण झाल्यानंतर नृत्य शिकले. त्या काळात आजसारखी सामाजिक माध्यमे नव्हती, तसेच कोणत्याही दिग्गज व्यक्तींचा आदर्श घेऊन शिकण्याची संधीही मिळाली नाही असे त्यांनी सांगितले.
नृत्य प्रशिक्षणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, नृत्याशी संबंधित एखादी गोष्ट असेल तर मी त्याला जोडली जाते. त्यामुळे आज मी नृत्यदिग्दर्शिका आहे. मी स्वत:ला आधी नृत्यांगना म्हणून बघते त्यानंतर शिक्षक. तसेच आजकाल दोन-तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन लगेच नृत्यवर्ग सुरू केले जातात. पण नृत्याचे बेसिक, भाव आणि आनंद घेणे शिकवणेही महत्त्वाचे आहे. तांत्रिक गोष्टी नंतर शिकवाव्यात. शास्त्रीय नृत्याचा पाया असेल तर कोणताही प्रकार शिकता येतो. कथ्थकाचा पाया असल्यामुळे मला लावणी शिकता आली.
खामकर पुढे म्हणाल्या, आजची तरुण पिढी चटकन शिकते, पण खरी मजा भावपूर्ण सादरीकरणात आहे. कोणाच्या नृत्यकृतीची नक्कल करून नाचणे हा आनंद नाही. नृत्य करिअर म्हणून नसेल तरी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी नक्कीच करायला हवे. नृत्यासाठी वयाची अट नाही; जाड किंवा बारीक कुणीही नृत्य करू शकते. त्याचप्रमाणे व्यासपीठ आणि चित्रपट नृत्यदिग्दर्शनामध्ये फरक असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्न, सातत्य आणि स्पर्धा यांचा संगम आवश्यक आहे. कोणतेही करिअर असो लोकांवर अवलंबून राहण्याऐवजी आपणच स्वतःच्या मेहनतीवर करिअर घडवावे असेही त्यांनी सांगितले.