डोंबिवली – जम्मु काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मंगळवारी मरण पावलेल्या, एकत्रित परिवारातील सदस्य या नात्याने वावरलेल्या समवयस्क संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिन्ही मावस भावांची बुधवारी रात्री डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. मैदानातील मंचकावरून पार्थिव सजविलेल्या ट्रकमध्ये नेत असताना तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांनी फोडलेल्या हंबरड्याने सर्वच उपस्थित गहिवरून गेले. दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभूमीत मृतांच्या वारसांनी पार्थिवाला अग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले.संजय लेले यांच्या पत्नी कविता यांचे हेमंत जोशी आणि अतुल मोने हे मावस आणि आत्ये भाऊ होते. समवयस्क असलेले संजय, हेमंत आणि अतुल हे डोंबिवली पश्चिमेत विविध भागातील गृहसंकुलात राहत असले तरी ते एकत्रित कुटुंबांचे सदस्य नात्याने वावरत होते.
कौटुंबिक कार्यक्रम, पर्यटन, तिर्थाटन अशावेळी ही तिन्ही कुटुंब एकत्र येत असत. या विचारातून ते जम्मु काश्मीरमधील पहलगाम येथे मुलांच्या परीक्षा आटोपल्याने पर्यटनासाठी गेले होते. पहलगाम जवळील बैसरन टेकड्यांवर पर्यटनासाठी गेले असताना मंगळवारी दुपारी त्यांच्यावर पोलीस वेशातील दहशतवाद्यांनी क्रूरपणे हल्ला केला. या हल्ल्यात संजय, हेमंत, अतुल जागीच मरण पावले. संजय यांचा मुलगा हर्षलच्या हाताच्या बोटाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला. कुटुंबीयांच्या समोर दहशतवाद्यांनी या तिघांना ठार केल्याने कुटुंबीय हादरून गेले आहेत.
मंगळवारी रात्री या तिघांच्या मृत्यूची बातमी पसरताच डोंबिवली शहरावर शोककळा पसरली. बुधवारी या तिघांचे मृतदेह श्रीनगर येथून खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, स्वीय साहाय्यक अभिजीत दरेकर यांच्या प्रयत्नाने मुंबईत रात्री आणण्यात आले. हे तिन्ही पार्थिव त्यांच्या डोंबिवलीतील राहत्या घरी दर्शनासाठी नेण्यात आले. तेथून भागशाळा मैदानात नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. अंत्यदर्शन घेताना कुटुंबीय, नातेवाईकांचे हुंदके, उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू असे शोकाकुल वातावरण होते. भागशाळा मैदानात नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती. मैदान नागरिकांनी तुडुंब भरले होते. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी उपस्थितांकडून करण्यात येत होती. भागशाळा मैदान परिसराची पोलिसांच्या श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.
अंत्ययात्रा
नागरिकांच्या अंत्यदर्शनानंतर फुलांनी सजविलेल्या तीन ट्रकमध्ये तिन्ही पार्थिव ठेवण्यात आले. अंत्ययात्रेला प्रारंभ होताच कुटुंबीयांनी मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. जय राम श्री रामचा गजर करत, व्यर्थ न हो बलिदान, दहशतवाद्यांचा निषेध करत अंत्ययात्रेला सुरूवात झाली. महात्मा गांधी रस्ता, कोपर पूलमार्गे अंत्ययात्रा शिवमंदिर स्मशानभूमी येथे नेण्यात आली. शोकाकुल वातावरणात संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पार्थिवांचे दर्शन घेतले. भागशाळा मैदानातील नियोजनाची जबाबदारी माजी नगरसेवक राहुल दामले, समीर चिटणीस, विवेक खामकर, शैलेश धात्रक, संदीप पुराणिक, साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पार पाडली.
मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थितीत पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले. मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली. याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संतप्त नागरिकांनी पाकिस्तान निषेधाच्या घोषणा दिल्या.