ठाणे : ठाणे शहरात गणेशोत्सव साजरा होत असतानाच राजकीय पक्ष, संस्था मार्फत चौक, रस्त्यालगत मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील चौक बकाल झाले असून महापालिकेकडूनही या बॅनरकडे डोळेझाक केली जात आहे. या प्रकारवरून सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, मेट्रो मार्गिकेच्या खांबांवरही फलक उभारण्यात आले आहेत.

गणेशोत्सव म्हटला की भक्तिभाव, उत्साह, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संदेशाचे कार्यक्रम अशी ओळख असते. मात्र ठाणे शहरात यंदा या सोहळ्याच्या आडून बॅनरबाजीचे राजकारण आणि स्पर्धा बघायला मिळत आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, पदपथ, वृक्ष आणि अगदी नव्याने उभ्या राहिलेल्या मेट्रो मार्गिकेच्या खांबांवर देखील मोठमोठे बॅनर, फलक आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी प्रायोजकांचे बॅनर उभारले आहेत.

वागळे इस्टेट, घोडबंदर येथील कासारवडवली, कळवा, नितीन चौक, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, पाचपाखाडी, कोपरी, तसेच गडकरी चौक परिसरात शेकडो बॅनर उभारण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, गणेश मंडळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे फोटो असलेले शुभेच्छा संदेशाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीमुळे शहराची सुंदरता पूर्णपणे विद्रुप झाली आहे.

महापालिकेची डोळेझाक

शहरातील अशा अवैध बॅनरबाबत महापालिकेने कारवाई करण्याची जबाबदारी असली तरी प्रत्यक्षात मात्र कारवाई होताना दिसत नाही. काही बॅनरवर महापालिकेची परवानगीच नाही, तर काही ठिकाणी परवानगी असूनही नियमानुसार ते उभारलेले दिसत नाही. वृक्ष, रस्ते अडवून उभारण्यात आलेल्या या बॅनरकडे महापालिकेकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मेट्रो खांबांवरही फलक

ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. यासाठी मेट्रोचे खांब उभारण्यात आले आहेत. परंतु या खांबांवरही फलक आणि बॅनर लावले गेले आहेत.

नागरिकांकडून नाराजी

ठाणे शहरातील मुख्य चौक, अंतर्गत मार्गावरील रस्त्यालगत हे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांडून संताप व्यक्त केला जात आहे. भाविकांनी तर शुभेच्छांचे बॅनर उभारण्यास सांगितले नव्हते. तर मग ही जाहीरातबाजी कशासाठी असा प्रश्न संतप्त ठाणेकर विचारत आहेत.

निवडणूकांची तयारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका केव्हाही लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या बॅनरच्या आधारे जाहीरातबाजी सुरु झाली आहे. असे असले तरी शहर विद्रूप होत असल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.