Ghodbundar ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते मुख्य रस्त्यांमध्ये जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु हा प्रकल्प भविष्यात डोकेदुखी ठरु शकतो हे या रस्त्याच्या आर माॅल ते मानपाडा येथील टप्प्यावरून दिसून येत आहे. सेवा रस्ता नसल्याने या भागात आता मुख्य मार्गावरूनच भरधाव वेगाने वाहने विरुद्ध दिशेने वाहतुक करत आहेत. येथे बसगाड्यांचा थांबा आहे. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.
घोडबंदर भागात नागरिकरण वाढल्यानंतर येथील मार्गावर वाहनांचा भारही वाढला. त्यामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वी अरुंद असलेल्या घोडबंदर मार्गाचे हळूहळू रुंदीकरण झाले. ‘जेएनपीए’ बंदरातून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने देखील याच मार्गावरून वाहतुक करु लागतात. घोडबंदर मार्गावर मिरा भाईंदर भागात वरसावे येथे टोलनाका होता. हा टोलनाका चार वर्षांपूर्वी बंद झाल्यानंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीचे प्रमाण आणखी वाढले. त्यातच मागील काही वर्षांपासून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम घोडबंदर मार्गावर सुरु आहे. खोदकामामुळे सेवा रस्त्याची आणि मुख्य रस्त्याच्या अवस्था वाईट झाली आहे.
आता घोडबंदर मार्गाची कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सेवा मार्गिका मुख्य मार्गिकेला जोडण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता मुख्य रस्त्यात सामावेश होणार आहे. टप्प्या-टप्प्याने ही कामे केली जात आहे. हे काम पूर्ण झाल्यास वाहतुक समस्येची डोकेदुखी वाढणार असल्याचे रहिवासी सांगतात. येथील आर माॅल ते मानपाडा हा टप्पा तात्पुरत्या स्वरुपात पूर्ण झाला आहे. परंतु हा टप्पाच वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे चित्र आहे.
काय होत आहे
यापूर्वी आरमाॅल ते मानपाडा येथे मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता होता. त्यामुळे मनोरमाननगर, आरमाॅल, कापूरबावडी, ढोकाळी परिसरातून घोडबंदर किंवा मानपाडा येथे वाहतुक करणाऱ्या चालकांना सेवा रस्ता उपलब्ध होता. तर मुख्य मार्गावरून वाहतुक करणारे ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करू शकत होते. आता सेवा रस्त्यामधील दुभाजक काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे मनोरमा नगर, आर माॅल, कापूरबावडी, ढोकाळी भागातून मानपाडा येथे वाहतुक करणाऱ्यांना सेवा रस्ताच उपलब्ध नसल्याने ही वाहने धोकादायकरित्या मुख्य मार्गिकेवरून वाहतुक करत आहेत. याच मार्गावर टीएमटीचा बसगाडीचा थांबा आहे. मानपाडा भागातील शेकडो नागरिक ठाण्याच्या दिशेने बसथांब्यावर उभे असतात. त्याचवेळी विरुद्ध दिशेने वाहतुक होत असते. त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्याय नसल्याने हाल
– कापूरबावडी, आरमाॅल, मनोरमानगर भागातून मानपाड्याच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी वाहन चालकांना घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी थेट कापूरबावडी जंक्शन येथे जावे लागते. हा मार्ग फेऱ्याचा असल्यामुळे आता वाहतुक कशी करावी असा प्रश्न चालकांना पडला आहे. याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नव्हती.