ठाणे : घोडबंदर भागातील वाहतुकीस महत्त्वाच्या असेल्या गायमुख घाटात काही दिवसांपूर्वीच मिरा भाईंदर महापालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण होऊन दोन आठवडे उलटत नसताना मार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याचा आरोप वाहन चालक करत आहेत. या दुरुस्ती कामाच्या कालावधीत मुंबई अहमदाबाद मार्गावर वसईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु अवघ्या काही दिवसांत मार्गावर खड्डे पडू लागल्याने आता रस्ता दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
गुजरात येथून उरण जेएनपीए बंदर आणि भिवंडी येथे वाहतुक करणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वाहतुक करतात. घोडबंदर भागात लोकवस्ती वाढली असून या भागात राहणारे व्यापारी, नोकरदार देखील ठाणे-घोडबंदर घाट मार्गे बोरीवली, दहिसर, मिरा भाईंर, वसई-विरारच्या दिशेने वाहतुक करत असतात. तसेच तेथील नागरिक देखील ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर सर्वाधिक करतात. ११ ऑक्टोबरला गायमुख घाटाजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते निरा केंद्र या भागाच्या दुरुस्तीचे काम मिरा भाईंदर महापालिकेने सुरु केले होते. किमान तीन ते चार दिवस हे काम घाटात सुरु होते.
या दुरुस्तीच्या कामा दरम्यान मुंबई अहमदाबाद मार्ग, घोडबंदर घाटात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. मुंबई अहमदाबाद मार्गावर फाऊंटन ते वसई पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने तीन ते चार तास वाहतुक कोंडीत अडकून होती. रस्ते दुरुस्ती झाल्यानंतर येथील खड्ड्यांपासून आणि कोंडीपासून काहीप्रमाणात दिलासा मिळेल असे अनेकांना वाटत होते. परंतु दुरुस्ती कामानंतर दोन आठवडे उलटत नसताना पुन्हा एकदा निरा केंद्र भागात खड्डे निर्माण होत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. सध्या या मार्गावरून वाहतुक कमी असल्याने वाहतुक कोंडी होत नाही. वाहतुक वाढल्यास पुन्हा एकदा कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होईल असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
