कल्याणमध्ये एका ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना एक कोटी ५६ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. शहरामधील मे. एस कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड या ज्वेलर्सने तब्बल २६ जणांची अधिक व्याजदर देतो सांगून फसवणूक केलीय. या प्रकरणामध्ये सध्या ज्वेलर्सच्या दुकानाचं शटर बंद झालं असून येथील व्यवस्थापकीय संचालक फरार झालाय. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

नक्की घडलं काय?
कल्याण पश्चिमेकडील वल्लीपीर मार्गावरील झोझवाला हाऊसमधील मे. एस कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंडचे शटर अचानक बंद झाल्याने त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पुरते धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत या शोरूमच्या मालक, चालक आणि संचालकांनी २६ गुंतवणूकदारांना तब्बल १ कोटी ५६ लाख ७४ हजार ५३९ रूपयांचा चुना लावल्याच्या तक्रारी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या संदर्भात कल्याण मलंगगड रोडला अमृता पार्क सोसायटीत राहणाऱ्या रोशल गावित (३३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४०६ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कायद्यातील कलम तीन अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

१५ ते १८ टक्के रिटर्नसच्या नावाने फसवणूक
१५ ते १८ टक्के व्याजदराने पैसे रिटर्न मिळण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या ज्वेलर्स दुकानाचा व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार पिल्लई याने मुदत ठेवीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष लोकांना दाखवले. तसेच गोल्ड स्किमच्या गुंतवणूकीमध्ये माफक दरात सोने व डायमंड देत असल्याचे व त्याकरीता त्यांच्याकडे मासिक भिशी योजना, फिक्स डिपॉजीट योजना अशा आकर्षक योजना चालू असल्याचे भासवून लोकांकडून पैसे घेतले. या पैशांवर १५ ते १८ टक्के व्याजदराने रिटर्न मिळतील अशी जाहीरातबाजी त्याने केली.

सोनेही नाही आणि पैसेही नाही
सन २०१८ ते सन २०२१ पर्यंतच्या कालावधीत मे. एस. कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड ज्वेलर्सच्या श्रीकुमार पिल्लईने रोशल गावित यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपये, त्यांची आई क्लाडेट परेरा यांच्याकडून १० हजार रुपये गुंतवणूक म्हणून घेतले. मात्र या पैशांच्या मोबदल्यात सोने दिले नाही. तसेच त्यांचे घेतलेले पैसे परत न करता त्यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली. त्याचप्रमाणे श्रीकुमारने अन्य ग्राहकांकडून पैसे स्वीकारुन त्यांना देखील सोने, डायमंड न देता किंवा घेतलेली रक्कम परताव्यासह परत न करता दुकान बंद करून पळ काढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कागदोपत्री पुराव्यांसह पोलिसांकडे अर्ज
यातील फिर्यादी रोशल गावित आणि त्यांची आई क्लॉडेट यांनी तक्रार दाखल केलीय. तसेच इतर २५ तक्रारदारांची मिळून एकूण १ कोटी ५६ लाख ७४ हजार ५३९ रुपये इतक्या रक्कमेचा अपहार करून फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. मे. एस कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड ज्वेलर्सचा व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमारविरोधात या तक्रारी करण्यात आल्यात. सर्व तक्रारदारांनी कागदोपत्री पुराव्यांसह पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.