पर्यावरणसंवर्धनासाठी ‘ग्रीन आयडिया’

पर्यावरणाच्या विविध समस्या, पर्यावरण जागृतीचा संदेश आणि पर्यावरणसंवर्धन करणारे विविध उपक्रम या सर्वाची भेट ‘ग्रीन आयडिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळणार आहे.

पर्यावरणाच्या विविध समस्या, पर्यावरण जागृतीचा संदेश आणि पर्यावरणसंवर्धन करणारे विविध उपक्रम या सर्वाची भेट ‘ग्रीन आयडिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळणार आहे. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या अभिनव प्रकल्पांची माहिती ठाणेकरांना व्हावी या उद्देशाने ‘ग्रीन आयडिया’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जागतिक पर्यावरण दिनापासून म्हणजेच ५ जूनपासून ठाण्यातील गावदेवी मैदान येथे हे प्रदर्शन भरणार आहे. हे प्रदर्शन रविवार, ७ जूनपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वासाठी खुले राहणार आहे. 

प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, ५ जून रोजी सकाळी १० वाजता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे व आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी ६ वाजता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्यांना आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘ग्रीन आयडिया’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत सहभागी संस्थाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास कार्ले यांनी दिली.
प्रदर्शनाच्या निमित्ताने सलग तीन दिवस घरच्या घरी कचरा व्यवस्थापन, कागद, मातीपासून वस्तू बनवणे, हरित इमारत, संतुलित ऊर्जा व्यवस्थापन आदी विषयांवर जयंत जोशी, संजय धामणसे, संदीप गुरम, पुरुषोत्तम आगवण यांचे व्याख्यान सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तसेच हरियालीच्या वतीने पर्यावरणीय बदल व जंगल या विषयावर शुक्रवारी ६ वाजता विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शंभरहून अधिक औषधी वनस्पतींचे प्रकार व त्यांचे औषधी वापर याविषयी माहिती प्रदर्शनात पाहायला मिळेल. भारतातील विविध भागांत असलेल्या जैवविविधतेचे छायाचित्र प्रदर्शन यानिमित्ताने भरविण्यात आले आहे. पर्यावरण विषयावरील विविध लघुपट नागरिकांना पाहाता यावेत म्हणून लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, ठाणे महानगरपालिका यांच्यासह विविध सामाजिक, औद्योगिक अशा साठ संस्थांचे स्टॉल ग्रीन आयडिया प्रदर्शनात पाहायला मिळतील.

* या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे थ्री इडियट चित्रपटातील सायकल गिरणी हे सर्वात वेधक असे उपकरण या निमित्ताने ठाणेकरांना पाहता येणार आहे.
* सोलरवर चालणारी कार, शंभरहून अधिक औषधी वनस्पती, पवनऊर्जा, सौरऊर्जेचे मॉडेलसह जैवविविधतेवर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि लघुपटांचा आस्वाददेखील पर्यावरणप्रेमींना घेता येणार आहे.
* सौरऊर्जा, पवनऊर्जा, वर्षां जलसंचय, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन आशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.
* पर्यावरणपूरक जीवनशैली असायला हवी, अशी चर्चा सगळीकडेच सुरू असते. मात्र अशा जीवनशैलीसाठी लागणारी पूरक माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Green idea for environment conservation

ताज्या बातम्या