Kalyan Lehenga Refund fight : कल्याणमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीने खरेदी केलेला लेहेंगा परत करून पैसे परत घेण्यासाठी एका दुकानात गेला होता. मात्र, दुकानदाराने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणाने दुकानातच तो लेहेंगा चाकूने फाडून टाकला. सुमित सयानी असं या तरुणाचं नाव असून त्याच्या होणाऱ्या पत्नीने हा लेहेंगा खरेदी केला होता. मात्र, तिला तो लेहेंगा आवडला नाही. त्यामुळे तिने सुमितला तो लेहेंगा परत करण्यास सांगितलं. त्यानुसार सुमित दुकानात गेला आणि त्याने लेहेंगा परत देऊन रिफंडची (पैसे परत देण्याची) मागणी केली. त्यावर दुकानदाराने नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाने लेहेंगा चाकून फाडला.
दुकानदाराने सुमितला सांगितलं की आम्ही पैसे परत देऊ शकत नाही. त्याऐवजी तू दुसरा लेहेंगा निवड आणि तो घेऊन जा. मात्र, दुकानदाराची ही ऑफर सुमितच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्याने लेहेंगा फाडून टाकला.
दुकानात नेमकं काय घडलं?
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार सुमितने आधी दुकानातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर त्याने खिशातून चाकू काढला आणि त्याने लेहेंगा फाडला. सुमित चाकूच्या सहाय्याने लेहेंगा फाडत असल्याची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच सुमित दुकानदाराला म्हणाला, माझे पैसे परत दे, नाहीतर मी तुलादेखील असाच फाडून टाकेन. त्यानंतर सुमितने लेहेंग्यावरील ब्लाऊज फाडून जमिनीवर फेकला आणि तिथून निघून गेला.
दरम्यान, दुकान मालकाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. दुकान मालकाने पोलिसांना सांगितलं की सुमित मला म्हणाला की मी त्याची मागणी पूर्ण केली नाही तर तो मला देखील असंच फाडेल. त्याने माझ्याकडे तीन लाख रुपये मागितले. पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या दुकानाची समाजमाध्यमांवर बदनामी करेन, असंही तो म्हणाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सुमितचा शोध सुरू केला आहे.
सुमितच्या आधी त्याची होणारी बायको दुकानात आली होती. तिने देखील दुकानदाराला लेहेंगा घेऊन पैसे परत देण्याची मागणी केली होती. मात्र, दुकानदाराने नकार दिल्यानंतर तिने लेहेंगा परत देऊन पैसे आणण्याची जबाबदारी सुमितवर टाकली होती.