ठाणे : येत्या रविवार आणि सोमवारी या दोन दिवसांत गुढीपाडवा, संत झुलेलाल जयंती (चेटीचाँद)आणि रमजान ईद हे सण-उत्सव साजरे होणार असून यानिमित्ताने शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या मिरवणुका आणि कार्यक्रमादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरातील अनेक वाहतूक मार्गातही बदल लागू करण्यात आलेले आहेत. तसेच शालांत परिक्षा सुरू असल्यामुळे ध्वनी प्रदुषण करू नका आणि आवाजाच्या पातळीची मर्यादा ठरवून दिलेल्या आवाजापेक्षा जास्त नसावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रविवार, आज गुढीपाडवा आणि संत झुलेलाल जयंती तर, सोमवारी रमजान ईद साजरी होणार आहे. यानिमित्ताने ठाणे पोलिस आयुक्तालयातील गुढीपाडव्यानिमित्ताने ६५ मुख्य रस्त्यांवर मिरवणुका, ७ पालख्या, ३ ठिकाणी पथसंचलन, ४ दुचाकी मिरवणुका, ११ सार्वजनिक कार्यक्रम तर, संत झुलेलाल जयंती निमित्ताने दोन मिरवणुका, १ दुचाकी रॅली काढली जाणार आहे. तसेच रमजान सणानिमित्ताने सोमवारी मशीद, दर्गा याठिकाणी नमाज पठण केली जाणार आहे.

त्यामुळे मिरवणुका, कार्यक्रम आणि नमाज पठण या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार १ अप्पर पोलिस आयुक्त, ९ पोलिस उपायुक्त, १४ सहाय्यक पोलिस आयुक्त, ९३ पोलिस निरिक्षक, ४१३ सहाय्यक पोलिस निरिक्षक आणि उपनिरिक्षक, ४५१४ पोलिस अंमलदार, ४५० होमागार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या असा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याव्यतिरिक्त विशेष शाखेचे १ पोलिस उपायुक्त, १ सहाय्यक पोलिस उपायुक्त, ५ पोलिस निरिक्षक, १० सहाय्यक पोलिस निरिक्षक आणि उपनिरिक्षक, ८७ पोलिस अंमलदार असा बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. याशिवाय, ठाणे वाहतूक शाखा आणि गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

ठाण्यातील स्वागतयात्रे निमित्ताने वाहतुक बदलगुढीपाडवा सणानिमित्ताने ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेनिमित्त ठाणे पोलिसांनी ३० मार्चला, रविवारी शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत.

रविवारी सकाळी ६ वाजेपासून हे वाहतुक बदल लागू असतील. डाॅ. मूस चौक येथून साईकृपा उपाहारगृहाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. मूस चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जांभळीनाका, चिंतामणी चौक मार्गे वाहतुक करतील. अल्मेडा रोड, वंदना रोड येथून गजानन महाराज चौक मार्गे राम मारूती रोड परिसराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना वंदना टी पाॅइंट येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खोपट, चरई, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील. गोखले रोड, राम मारूती रोड येथून पु.ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गोखले रोड येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन हात नाका मार्गे वाहतुक करतील. टाॅवर नाका येथून गडकरी रंगायत चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना टाॅवर नाकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील.

तीन हात नाका येथून हरिनिवास चौक, मल्हार सिनेमा मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या टीएमटी बसगाड्यांना तीन हात नाका चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. टीएमटी बसगाड्या नितीन कंपनी, टीएमसी चौक, अल्मेडा रोड, खोपट, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील. सत्यम कलेक्शन दुकानाजवळून विष्णुनगर मार्गे नौपाड्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना विष्णुनगर येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने सत्यम कलेक्शन येथून सरळ घंटाळी मंदिर, तीन पेट्रोल पंप मार्गे जातील. चिंतामणी चौक ते गडकरी रंगायतन चौक परिसरात तलावाच्या बाजूस तसेच सेंट जाॅन द बॅपिस्ट शाळेच्या मागील बाजूकडील दोन्ही दिशेला वाहने उभी करण्यास मनाई असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी रंगायतन चौक ते डाॅ. मूस चौकाच्या दोन्ही दिशेला, गजानन महाराज चौक ते गोखले रोड दरम्यान राम मारूती रोडवरील दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास मनाई आहे.कोर्टनाका, जांभळीनाका आणि मुख्य बाजारपेठेत वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोर्टनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने आनंदआश्रम मार्गे वाहतुक करतील. महागिरी, खारकर आळी येथून जांभळीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना महाजनवाडी सभागृह येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने महाजनवाडी सभागृह, कोर्टनाका मार्गे वाहतुक करतील.