लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : शहरातील बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून टिकेचे धनी ठरत असलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईसाठी पालिकेकडून बांधकामांचा आढावा घेऊन नियोजन आखण्यात येत आहे. गणेशोत्सव आणि ईद या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असल्यामुळे या सणांनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेकायदा बांधकामांवरील कारवाईला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. .या बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिकाही होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त बांगर यांनी नुकतीच एक बैठक घेऊन त्यात बेकायदा बांधकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शहरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या तसेच येत्या काळात पुर्णत्वास येऊन अव्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा देऊ नये, असे निर्देशही त्यांनी टोरंट वीज कंपनीला दिले आहेत. वीज पुरवठा दिलेले अनधिकृत बांधकाम कोसळून दुर्घटना घडून जिवीत व वित्तहानी झाली तर, त्यास टोरंट कंपनीचे सर्व अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा-ठाणे : येऊरमधील बंगल्यांवर कारवाईला सुरूवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा दिल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी नगर अभियंत्यास दिले आहेत. त्यापाठोपाठ आता पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा बांधकामांचा आढावा घेऊन त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरू केली आहे. यानुसार नव्याने सुरु झालेल्या बांधकामांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. सुरूवातीला पहिल्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकामे झालेल्या आणि त्यानंतर पूर्णत्वास आलेल्या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात सर्वाधित बेकायदा बांधकामे सुरू असल्याची माहिती पालिकेच्या हाती आली असून या भागातील बांधकामांपासून कारवाईला सुरूवात होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.