ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागातील महाराष्ट्र बँक ते हनुमान मंदिर तिठ्यावरील रस्त्यावर मागील पाच दिवसांपासून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सतत कोंडी होते. अरुंद अशा या रस्त्यावरुन अवजड वाहने, शालेय बस, रिक्षा, मोटारी यांची एकाच वेळी वाहतूक होत आहे. कल्याण, डोंबिवली एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा एकमेव मध्यम मार्गी रस्ता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील बहुतांशी प्रवासी ठाणे, मुंबईकडे जाण्यासाठी आतापर्यंत मानपाडा रस्त्याचा वापर करुन शिळफाटा रस्त्याने इच्छित स्थळी जात होते. गेल्या आठवड्यापासून मानपाडा रस्त्यावरील साईबाबा चौक ते बुधाजी चौकापर्यंत दीड किलोमीटरचा रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वाहतूक विभागाने वळविली आहे. पर्यायी रस्ते अरुंद, खड्डे आणि खराब असल्याने प्रवासी या रस्त्यावरुन येजा करण्यास तयार नाहीत. मानपाडा रस्ता साईबाबा चौकातून बंद करण्यात आल्यानंतर सुरूवातीचे दोन दिवस नोकरदार प्रवाशांनी पर्यायी रस्त्याने शिळफाटा रस्त्याला जाण्याचा प्रयत्न केला. पर्यायी रस्ते धुळीचे, खोदून ठेवलेले आणि खड्ड्यांनी भरलेले असल्याचे प्रवाशांना दिसले. या रस्त्यावरुन रस्ते काम पूर्ण होईपर्यंत पुढील तीन ते चार महिने प्रवास करणे शक्य नाही. या रस्त्यावरुन दररोज प्रवास केला तर कार्यालय वेळेत गाठणे शक्य होणार नाही. असा विचार डोंबिवलीतील प्रवाशांनी केला.

हेही वाचा: कल्याण जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

बहुतांशी कर्मचाऱ्यांनी शिळफाटा रस्त्याने मुंबई, ठाण्यात जाण्याऐवजी कल्याण मधील पत्रीपूल, दुर्गाडी मार्गे जाणे पसंत केले आहे. यासाठी डोंबिवलीतील प्रवासी घऱडा सर्कल मार्गे, बंदिश हाॅटेल ९० फुटी रस्त्याने पत्रीपूलकडे जातात. डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी प्रवासी हा फेरफटका नको म्हणून ठाकुर्ली उ्डाण पूल (स. वा. जोशी शाळेजवळ) डावे वळण घेऊन ठाकुर्ली पूर्व रेल्वे फाटक, महाराष्ट्र बँक, हनुमान मंदिर येथील १० फुटाच्या अरुंद रस्त्यावरुन म्हसोबा चौकातून ९० फुटी रस्त्याने पत्रीपूल, दुर्गाडी दिशेने जातात. याचवेळी डोंबिवली पूर्व भागातील अनेक वाहन चालक पेंडसेनगर मधून ठाकुर्लीतून कल्याण दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. डोंबिवलीतील ही दोन्ही बाजुने आलेली वाहने महाराष्ट्र बँके्च्या समोर अरुंद रस्त्यावर अडकून पडतात. त्याचवेळी कल्याण कडून म्हसोबा चौकातून डोंबिवलीत येणारी वाहने हनुमान मंदिराच्या तिठ्यावर अडकतात. डोंबिवली एमआयडीसी, घरडा सर्कल, आजदे, २७ गाव भागातून येणारे वाहन चालक बंदिश पॅलेश हाॅटेल, मंगलमूर्ती संकुल येथून ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाकडे येतात. चारही दिशेने येणारी हलकी, जड, अवजड वाहने हनुमान मंदिराच्या तिठ्यावरील अरुंद भागात अडकतात. या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजुला ग्राहक, व्यापाऱ्यांच्या दुचाकी असतात. कोंडी होऊनही ते दुचाकी हटवत नाहीत. त्यामुळे कसरत करत चालक या भागातून वाहने बाहेर काढतात.

हेही वाचा: ठाणे: पोलीस ठाण्यात विषारी सापाची एंट्री; कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

मागील पाच दिवसांपासून सकाळ ते रात्री उशिरापर्यंत हा कोंडीचा प्रकार या भागात सुरू आहे. या ठिकाणी अरुंद रस्त्याचा विषय असल्याने वाहतूक पोलीस या भागाकडे अधक लक्ष देत नाहीत. डोंबिवलीत आगरी महोत्सव, उत्सव सुरू आहे. त्याठिकाणी चौक, रस्त्यावरील वाहतूक नियोजन करण्यासाठी एकाच वेळी पोलिसांचे जथ्थे तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकुर्लीतील रस्त्याचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाकडे पोलीस, वाहतूक सेवक उपलब्ध नसल्याने ठाकुर्लीतील स्थानिक जागरुक रहिवासी कोंडी झाली की वाहतूक नियोजनाचे काम करतानाचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसते.

शाळेच्या बहुतांशी बस याच अरुंद रस्त्याने येजा करतात. शाळेत येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. शाळा चालक ठाकुर्लीतील कोंडीने अस्वस्थ आहेत. या मार्गाने बस नेण्यात आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना त्यांच्या घर परिसरात कसे सोडायचे असा प्रश्न शाळा चालकांसमोर आहे. रविवारी रात्री नऊ वाजता ठाकुर्लीतील हनुमान मंदिर दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर चारही बाजुने एक किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hanuman mandir road thakurli in throes of vehicular congestion students suffer from traffic in dombivali tmb 01
First published on: 19-12-2022 at 14:44 IST