लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची पदे थेट मुलाखतीद्वारे भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. या भरती प्रक्रियेत फक्त सेवा निवृत्त अधिकाऱ्यांची सोय लावण्यात येणार आहे, अशी तक्रार आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे एका जाणत्या नागरिकाने केल्याने आयुक्तांच्या आदेशावरून ही प्रक्रिया तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने २३ नोव्हेंबर रोजी एका वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द केली होती. या जाहिरातीमध्ये ‘केडीएमटी’ उपक्रमात निवृत्त परिवहन उपव्यवस्थापक हे वर्ग एक संवर्गातील पद, सेवानिवृत्त लेखाधिकारी वर्ग दोनचे पद, उप मुख्य लेखापरीक्षक वर्ग ही तीन पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार असल्याचे प्रसिध्द केले होते.

आणखी वाचा-कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज ठप्प

परिवहन उपक्रमाची नोकर भरती सेवानियमावली यापूर्वीच मंजूर आहे. त्यामुळे परिवहन प्रशासन नियमबाह्य पध्दतीने, काही निवृत्त अधिकाऱ्यांची सोय लावण्यासाठी ही थेट मुलाखतीव्दारे भरती करत असल्याची तक्रार कल्याण मधील नागरिक मनोज कुलकर्णी यांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली होती. उप परिवहन व्यवस्थापक पद , लेखाधिकारी ही पदे पदोन्नत्तीने भरण्याची पदे आहेत. ती कंत्राटी पध्दतीने भरती करता येत नाही. उप मुख्य लेखा परीक्षक हे पद राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीने भरण्यात येणारे पद आहे, असे तक्रारदाराने आयुक्त जाखड यांच्या निदर्शनास आणले होते.

आणखी वाचा-ठाणे : आईच्या आजारपणावर उपाय म्हणून मुलीचे संशोधन

थेट मुलाखतीव्दारे करण्यात येणाऱी ही पद भरती सदोष असल्याचे निदर्शनास आल्यावर आयुक्तांनी ही प्रक्रिया तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत माजी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेतील निवृत्त विधी अधिकारी आनंद सूर्यवंशी यांची विधी विभागात करार तत्वावर नियुक्ती केली आहे. तीन महिन्यासाठी ही नियुक्ती आहे. जाहिरातीव्दारे हे पद भरले की करार पध्दतीने भरलेले पद रद्द केले जाईल, असे त्यावेळी दांगडे यांनी सांगितले होते. तीन महिने उलटूनही प्रशासनाने विधी विभागाचे रिक्त पद का भरले नाही, असा प्रश्न तक्रारदाराने केला आहे. याशिवाय पालिकेचे प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्पांचे ढिसाळ नियोजन करणारा एक अभियंता आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. हा अभियंताही पुन्हा स्मार्ट सिटी प्रकल्पात येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तक्रारदारने आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ सेवानिवृत्तांमधून काही पदे उपक्रमात थेट मुलाखतीव्दारे भरण्यात येणार होती. ही प्रक्रिया स्थगित केली आहे.” -डॉ. दीपक सावंत, परिवहन व्यवस्थापक, केडीएमटी.