ठाणे – हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास अतिवृष्टीचा (रेड अर्लट) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या ४८ तासातही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी जिल्ह्यातील यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तसेच महानगरपालिका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाबरोबरच एनडीआरएफ, आपदा मित्र, टीडीआरएफची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनीही अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. आपत्ती विषयक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत बँकेतून बाहेर पडताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

रायते पुल वाहतुकीसाठी खुला

कल्याण तालुक्यातील रायते पुलावर नदीच्या पाण्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. गुरुवारी दुपारनंतर पुलावरील पाणी ओसरले आहे. नदीच्या पाण्यामुळे पुलावर अनेक ठिकाणी घाण साचली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही घाण काडून सफाई केली तसेच पुलावरुन वाहतूक सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.