ठाणे :ठाण्यात शुक्रवारी पहाटे पासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४४ मीमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पूल, मुलुंड टोलनाका येथे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदारांना वाहतुक कोंडीचा सामना सहन करावा लागला. मुंबई नाशिक महामार्ग तसेच शहरातील इतर मार्गांवर देखील वाहतुक संथ होऊन कोंडी झाली होती.
ठाणे शहरात पहाटे पासूनच पावसाला सुरुवात झाली. ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार, सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४४.९५ मीमी पाऊस पडला. ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसामुळे वाहतुक संथ होऊन त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर बसला. पूर्व द्रुतगती महामार्गावरून हजारो वाहनांची वाहतुक मुंबईच्या दिशेने होत असते. त्यामुळे सकाळी माजिवडा, तीन हात नाका, कोपरी पूल भागात वाहनांचा भार अधिक असतो. सकाळी या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली. येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या दोन वाहिनीवर अडथळे तयार करुन या वाहिन्या मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे ठाण्यातील वाहतुक कोंडी सुटली. परंतु मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना अरुंद मार्गिका उपलब्ध असल्याने मुंबईहून ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.
मुंबई नाशिक महामार्गावरही खारेगाव टोलनाका, साकेत परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाण्याहून नवी मुंबई, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांना कोंडीचा फटका बसला. भिवंडीतील काल्हेर भागात देखील वाहतुक कोंडी झाली होती. पावसामुळे सकाळी शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना पावसाचा परिणाम जाणवला.
दरम्यान, गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कळवा शहरातील विटावा भागात गृहसंकुलाची संरक्षण भिंत कोसळली. ही भिंत १५ फूट लांब आणि ५ फूट उंच आहे. भिंत गृहसंकुलाच्या आवारात पडल्याने सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. भिवंडी शहरातही पाऊस पजत होता. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. भिवंडीतील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. भिवंडी शहरातील अंतर्गत मार्गावरही वाहतुकीचा वेग मंदावून वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागला.