कल्याण – कल्याण डोंबिवली परिसरात दोन दिवसांपासून गच्च पावसाच्या ढगांनी आभाळ भरून आहे. सूर्याचे दोन दिवस दर्शन नाही. वातावरण मुसळधार पावसाचे असले तरी पावसाची मात्र रिमझिम सुरू आहे. सर्वदूर रस्त्यांवर पावसाने चिखल आणि रिपरिप करून ठेवली आहे.मान्सूनच्या आगमनाची तयारी नागरिकांकडून सुरू असतानाच, मे महिन्यात नागरिक ऑगस्ट महिन्यातील काळोखी पावसाचा अनुभव घेत आहेत. उल्हास खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असला तरी तसा जोर कल्याण डोंबिवली परिसरात दिसत नाही. आभाळ पावसाच्या ढगांनी काळेकुट्ट आहे. झोड पाऊस पडेल या भीतीने नागरिकांनी घर परिसरात, व्यापारी, फेरीवाले, दुकानदारांंनी आपल्या व्यवसायाच्या परिसरात पावसाचा फटका नको म्हणून आवराआवर करून ठेवली आहे.
मुसळधार पावसाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले नसल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. नेहमीचे फळ, भाजीपाला विक्रेते भाजीपाल्याची पावसामुळे नासाडी नको म्हणून विक्री होणारा माल रस्त्यावर ठेऊन विक्री करत असल्याचे बाजारांमध्ये चित्र आहे. पहिल्या पावसाच्या दरम्यान येणाऱ्या रानभाज्या विकण्यास मात्र कल्याण, डोंंबिवली, बदलापूर, मलंगगड, भिवंडी ग्रामीणमधील महिला रेल्वे स्थानक, विजेचे खांब, इमारती, दुकानांच्या आडोशाला बसून रानभाजा विक्री करत आहेत.
उल्हास खोऱ्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे उल्हास नदी दुथडी वाहत आहे. उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याच्या, या नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याच्या दृश्यचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. ही दृश्य पाहून कल्याण डोंबिवली परिसरातील वालधुनी नदी काठच्या नागरिकांनी पुराचे पाणी घरात घुसू नये म्हणून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.
रात्री आठ नंंतर पडणाऱ्या काळोखाचा अनुभव सोमवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिक घेत आहेत. वाहन चालक समोरील प्रकाश दिवे लावून वाहने चालवित असल्याचे दृश्य आहे. वातावरण मुसळधार पावसाचे असले तरी पावसाची कधी सर तर कधी रीपरिप असेच चित्र कल्याण डोंबिवलीत आहे. या रिमझिम पावसामुळे रस्तोरस्ती चिखल झाला आहे. कल्याण, डोंंबिवली शहरात अनेक भागात सीमेंट काँक्रीटची रस्ते कामे सुरू आहेत. या रस्ते कामांच्या ठिकाणी पाणी तुंबल्याचे प्रकार घडले आहेत.
दाटुन असलेला पाऊस कोणत्याही क्षणी कोसळायला लागेल या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. शहर परिसरात कोठेही पाणी तुंबू नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यापूर्वी पाणी तुंबल्याचे प्रकार घडलेल्या भागात पाहणी दौरे सुरू केले आहेत. उल्हास खोऱ्यात पडलेला पाऊस उल्हास नदीतून वाहून जाणार असल्याने कल्याण डोंबिवली परिसरात उल्हास नदी काठी पूर परिस्थिती येऊ शकतो या दिशेने पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.