ठाणे : ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्यात पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली होती. या निर्णयामुळे ठाणे ग्रामीण, मिरा-भाईंदर, वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यात वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या बालिकेस जीव गमवावा लागल्याच्या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागताच, ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यापुर्वीचे वाहतूक बदल रद्द करण्याची नामुष्की दोन दिवसांतच ओढावली. ठाणे जिल्ह्यातून दिवसा म्हणजेच सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवजड (दहा चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त) वाहतूकीला परवानगी देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी तशी अधिसुचना काढली आहे.

ठाणे शहरासह घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांकडून आंदोलने होत आहे. या पार्श्वूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजेनंतरच अवजड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते. दरम्यान रात्री बारा वाजेपूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले होते.

या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्री १२ ते पहाटे ६ यावेळेत अवजड वाहनांना वाहतूकीची परवानगी देण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसुचना काढली होती. यामुळे घोडबंदरची वाहतूक सुरळीत झाली असली तरी ठाणे ग्रामीण मिरा-भाईंदर, वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यात वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या बालिकेस जीव गमवावा लागल्याच्या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागताच, ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यापुर्वीचे वाहतूक बदल रद्द केले. यामुळे दुपारच्या वेळेत बंद केलेली अवजड वाहतूक आता पुन्हा सुरू होणार आहे.

प्रवेश बंदी

ठाणे जिल्ह्यातून २० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पहाटे ५ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ११ यावेळेत अवजड (दहा चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त) वाहतूकीला प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसुचना काढली आहे. यानुसार, पालघर वाडा रोडने अंबाडी मार्गे भिवंडी शहराकडे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना अंबाडी, गणेशपुरी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. चिंचोटी येथून खारबाव मार्गे ठाणे आणि भिवंडी शहराकडे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना खारबाव, भिवंडी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. वडपा चेक पोस्ट मार्ग ठाणे आणि भिवंडी शहराकडे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना वडपा, भिवंडी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

नाशिककडुन मुंबईकडे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना कसारा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिककडून मुंबईकडे समृध्दी महामार्गाने जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना इगतपुरी बोगदा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिक महामार्गाकडून बदलापुर, नवी मुंबई, पुणे, उरण, नाव्हाशेवा, येथे जाणेकरीता बापगाव, गांधारी मार्गे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना तळवली, पडघा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुरबाड येथून शहाड मार्गे कल्याण दिशेकडे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना मुरबाड चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. कर्जत कडुन बदलापुर कडे येणा-या सर्व जड-अवजड वाहनांना वांगणी, कुळगांव येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या अधिसुचनेतून अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलिसांची वाहने, जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने वगळण्यात आली आहेत.

ठाणे ग्रामीण जिल्हयातील वाहतूक पर्यायी मार्ग

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरुन नाशिककडून शहापूर येथे किन्हवलीकडे वळण घेवून शेणवा किन्हवली -मुरबाड म्हसा कर्जत चौक मार्गे जेएनपीटी नवी मुंबईच्या दिशेने वाहने जाऊ शकतील. गणेशपुरी, भिवंडी, पडघा, वासिंद पोलीस स्टेशन अंतर्गत नाशिककडे जाण्याचा पर्यायी मार्ग अबिटघर कांबारे येथून उजवीकडे वळण घेऊन पिवळी-वेल्हे-दहागाव मार्गे वासिद शहापूर मार्गे नाशिककडे जाऊ शकतील.

महत्वाच्या सूचना

अधिसूचनेच्या कालावधीत कसारा, शहापूर मुंबई मार्गिका, शहापूर नाशिक मार्गिका, वाशिद, भिवंडी आणि आवश्यक त्या ठिकाणी अवजड वाहनांना थांबविण्यासाठी व्यवस्था उपलब्ध आहे. अवजड (१० चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त) वाहनांना थांबविण्यासाठी नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील सुयोग्य ठिकाणी होल्डींग प्लॉटस् सुनिश्चित करण्याबाबत संबंधित विभागांनी उपाययोजना करावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे आणि पालघर यांच्यासह महामार्ग सुरक्षा पोलिसांनी त्याचे संनियंत्रण करावे.

पावसाळी परिस्थिती आणि रस्त्याची दुरावस्था विचारात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एमएलआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जेएनपीटी, एमएमआरडीए आणि सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी आपल्या हद्दीतील रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करून घ्यावी. तसेच, गरजेनुसार साधनसामुग्री पुरवून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ठाणे वाहतूृक शाखेचे पोलिस उपायुक्त आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना करावयाच्या आहेत. ही अधिसूचनेची माहिती आणि पालनासाठी जिल्ह्यातील सर्व प्रवेशद्वारांवर लावून वाहतुकीचे नियमन करण्यात यावे.

ठाणे जिल्ह्यात तीन पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रांचा समावेश होत असल्याने त्यांच्या लगतच्या कार्यक्षेत्रातील वाहतूक विभागाशी समन्वय ठेवून अवजड आणि प्रवासी वाहतूक याबाबत स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील वाहतूक नियंत्रणासाठी जड-अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीची वेळ निश्चित करून समन्वयाने उपाययोजना करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी डाॅ. पांचाळ यांनी केल्या आहेत.