ठाणे : वेतन वाढ तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात ठाणे जिल्ह्यासह पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, भंडारा, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यातून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक असे हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचा परिणाम, शहरातील वाहतुक व्यवस्थेवर झाला. ठाणे स्थानक परिसराला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडी होऊन त्यात शाळेच्या बसगाड्या अडकून पडल्या होत्या. या कोंडीमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतू, तीन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा मानधनवाढीचा शासकीय आदेश अद्याप काढण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी शहापूर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढून आंदोलन केले. यामध्ये राज्यातील विविध भागातील आशा सेविकाही सामील झाल्या होत्या.
हेही वाचा…एमआयडीसी भागात पायाभूत सुविधा द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्यासमोर विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी या आशा सेविका ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमल्या होत्या. या मोर्चासाठी सेंट्रल मैदानाजवळील कोर्टनाका ते ठाणे कारागृहापर्यंतचा एक रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे टेंभीनाका, कोर्टनाका, मासुंदा तलाव परिसरात दुपारच्या वेळेत वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले.
मिनाताई ठाकरे उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार पुलावर वळण घेऊन माघारी परतत होते. या वाहतुक कोंडीत शाळेच्या बस अडकल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास काहीसा विलंब झाला. तर, कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे कोंडीमुळे हाल झाले. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. रिक्षा कोंडी अडकल्यामुळे स्थानक परिसर आणि शहराच्या इतर भागात नागरिकांना बराच वेळ रिक्षाही मिळत नव्हत्या. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात नागरिक रिक्षा ची वाट पाहत उभे होते.
हेही वाचा…डोंबिवलीतील फडके रोड फलक मुक्त, बेकायदा फलकांवर पालिकेची कारवाई
आरोग्य मंत्र्यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी गटप्रवर्तकांना १० हजार रुपये, आश स्वयंसेविकांना ७ हजार आणि २ हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले होते. तसेच त्याबाबतचे शासकीय आदेश विनाविलंब काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तीन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा मानधनवाढीचा शासकीय आदेश काढण्यात आला नाही. यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी १२ जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला तीन आठवडे होऊन सुद्धा राज्य शासनाने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यामधून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचारी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमल्या होत्या.
आशास्वयंसेविकांना उष्मघाताचा त्रास
ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून निघालेल्या पदयात्रेतील १५ ते २० आशा स्वयंसेविकांना शुक्रवारी उष्मघाताचा त्रास झाला. त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा…दहिसरमधील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आरोप
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोर्चामुळे शहरात दुपारच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली असून ही कोंडी सोडविण्याचे काम वाहतूक पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. – डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा